सोलापूर : मोहोळ तालुक्यात धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. घरात जेवण करीत नाही आणि शाळेतही जात नसल्यामुळे एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून सावत्र आईने खून केल्याची घटना घडली आहे. नागनानाच्या स्टॉपजवळ ही महिला राहत होती. मोहोळ पोलिसांनी सावत्र आईला अटक केली आहे. ही माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.

कीर्ती नागेश कोकणे असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या सावत्र आईचे नाव पुढे आले आहे. ही महिला पतीच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुली आणि पतीसह मोहोळ तालुक्यातील वडवळ थांब्याजवळ एकत्र राहत होती. मृत पत्नीपासून जन्माला आलेल्या कीर्ती आणि आकृती या दोन मुलींसह एकत्र राहत होती. परंतु ती दोन्ही मुलींचा सतत छळ करायची.

यातून तिने कीर्ती या तीन वर्षांच्या चिमुकलीचा जेवण करीत नाही किंवा शाळेतही नियमित जात नव्हती यातून चिडून गळा आवळून खून केला. ही सावत्र आई या दोन्ही मुलींना चटके देणे, अमानुष मारहाण करणे, वेळेवर जेवण न देणे अशा स्वरूपात छळ करण्यासाठी पुढे येत असे. मोहोळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप हिने सावत्र आईविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे हे करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अलीकडेच अरण (ता. माढा) येथे एका दहा वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आला होता. स्वतःच्या नातेसंबंधातील अनैतिक संबंध मुलाने पाहिल्यामुळे त्याच्याच घरातील काहीजणांच्या मदतीने त्या मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला होता. तसेच मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे अलिकडेच स्वतःचे अनैतिक संबंध कायम स्वरूपी राहण्यासाठी एका विवाहित महिलेने तिच्या नातेवाईक असलेल्या प्रियकरासोबत एक अफलातून आणि चित्रपटात शोभेल कल्पना लढविली होती. यात पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील एका मनोरूग्ण महिलेला गुपचूपपणे उचलून आपल्या शेतातील वस्तीवर आणले आणि नंतर तिचा खून केला.

तिचा मृतदेह एका कडब्याच्या गंजीत टाकून पेटवून देण्यात आला. ही महिला म्हणजेच घरातील संबंधित महिला प्रेयसी असल्याचे दिसून येण्यासाठी तिच्या छातीवर तिचा मोबाईल ठेवण्यात आला होता. परंतु पोलिसांनी सूक्ष्म तपास करून हा गुन्हा उजेडात आणला होता. प्रत्यक्षात जी महिला मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले, ती प्रेयसी कराडमध्ये आढळून आली होती. तिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.