शहराचे प्रश्न किंवा नागरी समस्या सोडविण्यात गेल्या तीन वर्षांत सत्ताधारी भाजपला फार काही यश आले नसले तरी केंद्र आणि राज्यातील सत्ता तसेच मुख्यमंत्रिपद व केंद्रातील महत्त्वाचे मंत्रिपद या बदलत्या संदर्भामुळे नागपूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नितीनभाऊ आणि देवेंद्रभाऊ या दोन ‘भरभक्कम भाऊं’मुळे नागपूरचे भाग्य उजळते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे दोघेही नागपूरचे लोकप्रतिनिधी. दोन्ही नेते नागपूर शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असतात. अगदी विरोधात असतानाही हे उभय नेते सभागृहांमध्ये शहराचे विविध प्रश्न मांडत. शहराचे प्रश्न मांडतो, पण सरकार दाद देत नाही, अशी तक्रार करण्यास विरोधात असताना वाव होता, पण आता दोन्ही नेत्यांकडे निर्णय घेण्याचे अधिकार आले आहेत. ‘वाडय़ा-बंगल्या’चे काहीही असो, शहराचे बारीक-सारीक प्रश्न सुटावेत, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
गेल्या तीन वर्षांच्या भाजपच्या कारकीर्दीचा आढावा घेतल्यास बहुतांशी आश्वासने कागदावरच राहिली. जाहीरनाम्यातील सिमेंट रस्ते, शहर बस सुविधा, २४ तास पाणीपुरवठा योजना, पथदिवे ही आश्वासने फार काही पुढे सरकू शकलेली नाहीत. त्यातील काही कामे अद्यापही अपूर्णावस्थेतच आहेत. लोकसहभागातून अधिकाधिक योजना राबविण्याचा संकल्प केल्यानंतर नाग नदी स्वच्छता, वृक्षारोपण, गणपती मूर्ती विसर्जन, ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’अंतर्गत स्वच्छता मोहीम आदी योजना राबविल्या. त्यांना काही सामाजिक संघटनांसह नागरिक आणि शासकीय पातळीवर प्रतिसाद मिळाला. मात्र नगरसेवक आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोकसहभाग कमी होत गेला. टी. चंद्रशेखर आयुक्तपदी असताना त्यांनी नागपूर शहराच्या रस्त्यांची सुधारणा केली होती. एकेकाळचे गुळगुळीत रस्ते नावाला दिसत नाहीत. अनेक दिवसांपासून सुरू असलेली कोटय़वधी रुपयांच्या सिमेंटच्या रस्त्यांची कामे बंद आहेत. पावसाळ्यात लोकांना रस्ते आणि खड्डे यांतील फरक समजत नाही, अशी काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. अंतर्गत रस्त्यांबाबत न बोललेलेच बरे.
राम भाकरे, नागपूर
जनहिताचा विचार व्हावा
भाजप सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या मनात अनेक अपेक्षा निर्माण केल्या. त्यातील काही अंशी पूर्णत्वास आल्या, तर काही झाल्याच नाहीत. लोकांना हवे खड्डेविरहित रस्ते, चांगले क्रीडांगण आणि नागरी सुविधा. त्याच मिळत नाहीत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.
-डॉ. वि. स. जोग, ज्येष्ठ साहित्यिक