सातारा : ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने शिखर शिंगणापूरमध्ये रणरणत्या उन्हात अवजड अशा कावडींनी मुंगी घाट सर केला. कावड यात्रेला लाखो भाविकांनी आणि कावडधारकांनी मोठा प्रतिसाद दिला. रणरणत्या उन्हातून अवजड अशा कावडी घेऊन ‘म्हाद्या धाव म्हाद्या पाव,’ ‘हर हर महादेव’ असा जयघोष करत शिवभक्तांनी अवघड असा मुंगी घाट सर करत मानाच्या कावडींमधील पाण्याने शंभू महादेवाला अभिषेक घालून यात्रेची सांगता झाली.

कावड म्हणजे तांब्याचे दोन हंडे, त्यावर उंच असा झेंडा, त्याला विविध रंगांचे कपडे लावून कावडी सजवण्यात आल्या होत्या. कावड समांतर राहण्यासाठी त्याला सर्व बाजूंनी दोरखंडही लावण्यात आले होते. हळूहळू कावडी पुढे सरकत होत्या. अनेक लहान लहान कावडींनी चढाई करून पहिला टप्पा उत्साहात पार केला. मुंगी घाटाची चढाई करून राज्यभरातून आलेल्या मानाच्या कावडींतील पाण्याने महादेवाला अभिषेक घालण्यात येतो. अवघड डोंगर चढून भाविक कावडी घेऊन कड्याकपारींत पाय खुपसून महादेवाचा धावा करत वर आले. दुपारी संत तेली भुतोजीबुवा यांची कावड मुख्य मार्गावर दाखल झाली आणि प्रत्यक्ष त्या कावडीने अवघड असा मुंगी घाटाचा प्रवास सुरू केला. भर दुपारी या डोंगरातून हजारो भाविक हा थरार पाहण्यासाठी उपस्थित होते.

कावड मिरवणुकीपुढे ढोल, ताशा, सनई, हलगी या वाद्यांचा गजर सुरू होता. कावड खांद्यावर घेऊन नाचवली जात होती. सर्व जण तल्लीन होऊन नाचत होते. कावडी महादेवाच्या मंदिरात दाखल होऊन कावडीमधून निरा नदीसह पंचनद्यांच्या आणलेल्या पाण्याने शिखर शिंगणापूरच्या महादेवाला अभिषेक घालण्यात आला. एकमेकांच्या हातात हात घालून मानवी साखळीद्वारे हा घाट मोठ्या उत्साहात चढत अनेक कावडी वर आल्या.

शिखर शिंगणापूर येथील महादेवाची कावड यात्रा शिवमंदिरात गुढी उभारून सुरू झाली होती. हळदीच्या कार्यक्रमानंतर ध्वज बांधण्यात आला. शिखर शिंगणापूरच्या गडाचे मालक खासदार उदयनराजे भोसले आणि इंदूरचे काळगौडा राजे यांनी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. या वेळी पुणे, सोलापूर, सातारा, मराठवाड्यासह विदर्भातील कावडधारकांनी आणि भाविकांनी मोठ्या भावभक्तीने जयघोष केला.

शिखर शिंगणापूरचा डोंगर हा सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेतील अखेरच्या टप्प्यातील डोंगर आहे. अतिउंच असलेला मुंगी घाट या डोंगरात आहे. खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ या पंचक्रोशीमधून मोठ्या प्रमाणात कावडींनी मुंगीघाटाचा अवघड टप्पा पार करत शंभू महादेवाला अभिषेक घातला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंगी घाटातून कावडी वर चढून आल्यावर मानाच्या कावड्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी महसूल, पोलीस, पंचायत समिती, वैद्यकीय आदी प्रशासकीय विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.