देशभरातील व्याघ्र प्रकल्पातील कोअर, बफर व नियमित जंगलात १६ ते २३ जानेवारी या कालावधीत व्याघ्रगणना करण्यात येणार आहे. ट्रांझिट लाईन व कॅमेरा ट्रॅपिंग पध्दतीने ही गणना केली जाणार आहे. वाघांचे अस्तित्व असलेल्या १७ राज्यातही ही व्याघ्रगणना केली जाणार आहे.
देशभरातील व्याघ्र प्रकल्पात दर चार वर्षांंनी वाघांची गणना केली जाते. २०१० मध्ये व्याघ्रगणना झाल्यानंतर आता २०१४ मध्ये ही गणना केली जाणार आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांचे अस्तित्व असलेल्या देशभरातील १७ राज्यांना तशी सूचना दिली असून १६ ते २३ हा आठवडाभराचा कालावधी व्याघ्रगणनेसाठी निश्चित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, सहय़ाद्री, नागझिरा, पेंच या पाच व्याघ्र प्रकल्पांसह गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, मेळघाट, वर्धा, तसेच पश्चिम, उत्तर महराष्ट्रासह राज्यातील ५ हजार ५०० बिटांतर्गत ही गणना केली जाणार आहे. व्याघ्रगणनेत पहिले तीन दिवस ट्रान्झिट लाईन पध्दतीने गणना केली जाणार आहे. या गणनेत प्रत्येक ट्रान्झिट लाईनवर तीन कर्मचारी काम बघणार आहेत. त्यासोबतच ठरवून दिलेल्या मार्गावर वन्यप्राण्यांची विष्टा व पगमार्क गोळा करणे, तसेच वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहे.
चार वर्षांपूर्वी २०१० मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेनुसार देशात १ हजार ७०६ वाघ होते, तर २००६ मध्ये १ हजार ४११ वाघ होते. जानेवारीत होणाऱ्या या व्याघ्रगणनेचा अहवाल डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहेत. ही गणना चार टप्प्यात होणार आहे. कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून होणारी गणना ही भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. त्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ.हबीब बिलाल हे ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पात काम बघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावर्षी प्रथमच गोवा व नागालॅंड येथेही व्याघ्रगणना होणार आहे. महाराष्ट्रातील पाच व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रगणनेच्या दृष्टीने तयारीला सुरुवात झालेली आहे.
व्याघ्रगणनेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना नुकतेच कान्हा येथे प्रशिक्षण देण्यात आले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी माडभुशी, चंद्रपूर वन विभागाचे एसीएफ पवार, मध्यचांदाचे रेड्डी, तसेच चंद्रपूर व अन्य विभागातील अधिकारी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होते. मध्यप्रदेशातील कान्हा येथे प्रशिक्षण घेऊन आलेल्या या सर्व अधिकाऱ्यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्य़ाअंतर्गत येणाऱ्या वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्याघ्रगणनेचे प्रशिक्षण दिले. व्याघ्रगणनेसंदर्भात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला तसे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.