धवल कुलकर्णी

नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्रात वाघांसाठी काहिशा खराब पद्धतीने झाली आहे. मोठ्या प्रमाणावर वाघ असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी वनविभागामध्ये शनिवारी सकाळी एका वाघाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यावर्षी महाराष्ट्र झालेला हा पहिला व्याघ्रमृत्यू. धक्कादायक बाब अशी की या वाघाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला कोणीतरी जाणून-बुजून मारून टाकले असावे, असे दिसते. मृत वाघाचे डोके आणि चारही पंजे धडापासून वेगळे करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होते.

शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र भुजमध्ये गावातील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार वाघाचे शव आढळले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मृत वाघाचे डोके आणि पंजे वेगळे केल्याचे निदर्शनास येताच हा मृत्यू नैसर्गिक नाही, असे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तेथेच एक गायही मरून पडलेली होती. वनखात्याने रविवारी गुराखी आणि मृत गायीच्या मालकाला अटक केली. त्यांची नावे बाजीराव मासखेत्री आणि राकेश झाडे असून मासखेत्री हे गाईचे मालक आहेत. मासखेत्री यांची चौकशी केली असता त्यांनी गुराखी झाडे यांचे नाव घेतले, आणि मान्य केले की मृत वाघाचे डोके आणि चारी पाय कापण्यात आले होते नंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी हे पुरलेले पाय नदीकाठी शोधून काढले. यातील सर्व नखे आधीच काढून घेण्यात आली होती. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टाने जानेवारी 20 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वनविभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण जरी लक्षात आले नसले तरी एक गोष्ट नक्की आहे आणि ती म्हणजे त्या वाघाची शिकार करण्यात आली आहे. “त्या गुराख्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण वाघाचे मुडके कापल्याचे मान्य केले. आम्हाला त्या गुराखीकडे वाघाचे मुडके सापडले. पण, पंजे सापडले नाहीत. वाघाचे दातही नव्हते,” अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

या वाघाचा आणि गायीचा मृत्यू साधारणपणे एक आठवड्यापूर्वी झाला असावा. कारण, दोघांची शरीर बऱ्यापैकी खराब झाली होती. मरण पावलेला वाघ हा साधारणपणे तीन वर्षाचा होता पण शरीर खराब झाल्यामुळे तो नर होता का मादी हे मात्र कळू शकलेले नाही.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूचे कारण जरी अद्याप सापडले नसले तरीसुद्धा हा शिकारीचा प्रकार आहे, हे मात्र स्पष्ट आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र आणि शेजारील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांमध्ये साधारणपणे महाराष्ट्रातील अर्धे वाघ आहेत. ताडोबामध्ये साधारणपणे 85 ते 90 वाघ असून ब्रह्मपुरीमध्ये त्यांची संख्या 40 च्या आसपास आहे. यामुळे येथे मानव-वन्यजीव संघर्ष याचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. 2018 च्या व्याघ्रगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील वाघांची संख्या ही साधारणपणे 312 असून भारतासाठीचा आकडा हा 2967 च्या आसपास आहेत.