रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या आंबा कलम बागेतील विहिरीत पडला. या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढून पुन्हा मुळ अधिवासात सोडले. बिबट्या पडलेली विहिर अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे.

मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर तत्काळ ही माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना देण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या बचाव पथकाने पिंजरा व आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

आंबा कलम बागेतील असलेली ही विहिर आयताकृती आकाराची, सुमारे १५ फूट लांब, १० फूट रुंद आणि २५ फूट खोल आहे. पाण्याची पातळी सुमारे ७ ते ८ फूट खोल असल्याने बिबट्या विहिरीतील दगडावर पाण्यात बसलेला अवस्थेत दिसला. वन विभागाच्या पथकाने तात्काळ विहिरीभोवती सुरक्षा जाळे टाकून परिसर बंदिस्त करुन दोऱ्यांच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात पथकाला यश आले.

यावेळी पशुधन विकास अधिकारी मालगुंड येथील स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असता बिबट्या पूर्णतः सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. हा नर बिबट्याचे वय अंदाजे ६ ते ७ वर्षे असून, विहिरीवर शेडनेट असल्याने तो भक्षाचा पाठलाग करताना अपघाताने विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे (पाली), सारीक फकीर (लांजा), विराज संसारे (रत्नागिरी), वनरक्षक शर्वरी कदम (जाकादेवी), प्राणीमित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे यांच्यासह पोलीस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, दिवे, गावचे सरपंच फैय्याज मुकादम, तंटामुक्ती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.