भारतात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘टिकटॉक’ने करोनाच्या लढाईत एक दमदार पाऊल टाकले आहे. या कंपनीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा देखील केला आहे.

देशात सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी टिकटॉक कंपनी पुढे आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे मनापासून आभार मानले आहेत. यासंदर्भात कंपनीने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून अॅपच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे करोनाविरोधात लढा देत आहोत याची माहिती दिली.

या पत्रात टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी म्हणतात, “महाराष्ट्रात आणि मुंबईत टिकटॉकसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हजारावर आहे. त्यामुळेच या राज्याप्रती दायित्वाच्या भावनेची आम्हाला जाणीव आहे. राज्याच्या पोलीस दलासाठी एक लाख मास्क उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. युएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली आहे.

टिकटॉक अॅपच्या माध्यमातून कंपनीने करोनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. करोनाविरोधातील लढ्यासाठी अधिकाधिक मदत गोळा व्हावा यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.