सातारा : आदिवासींच्या त्रासाला कंटाळून परत मूळ गावी आलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अर्धवट पुनर्वसन झालेल्या ग्रामस्थांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. या वेळी सहायक वनसंरक्षक बाबासाहेब हाके, बामणोली वन्यजीवचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, कांदाटी वन्यजीवचे वन परिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर, वनपाल संदीप पवार उपस्थित होते.

आम्ही आमच्या गावी चटणी-भाकरी खाऊनच सुखी होतो. आम्ही आमच्या मूळ गावी जातोय; असे सांगत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील मौजे रवदी, आडोशी, माडोशी, कुसापूर, खिरखंडी या पाच गावांच्या ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी एकसल सागाव या ठिकाणी २४२ हेक्टर जागेत १२० खातेदारांचे अर्धवट पुनर्वसन झाले. मात्र, येथील पुनर्वसित नागरिकांना १८ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यातच आदिवासींच्या त्रासाला कंटाळलेल्या व्याघ्र प्रकल्पग्रस्तांनी बामणोली येथील बैठकीत ‘साहेब, आम्ही कसं जगायचं! आम्ही आमच्या मूळ गावी जातोय. आम्ही तुमची जंगलं तोडत नाही, पण आम्हाला आमच्या मूळ गावी जाऊ द्या. चटणी-भाकरी खाऊन आम्ही तिकडंच सुखी होतो. आमची मातृभूमीच बरी हाय,’ असे म्हणत जगताप यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सांगितले, की गेली १० वर्षे शासनाने आमची नुसती आश्वासनांवर बोळवण केली आहे. आम्हाला वाटप केलेल्या क्षेत्रात पूर्वीपासून आदिवासींचे अतिक्रमण आहे. आम्हाला वारंवार आदिवासींच्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे.पुनर्वसित गावठाणामध्ये विजेची व्यवस्था नाही. रस्ते नाहीत, शेतीसाठी पाणी नाही. पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. रेशन मिळत नाही. पावसाळ्यात सतत जमीन खचते आदी समस्यांचा पाढाच प्रकल्पग्रस्तांनी वाचून दाखवला.दरम्यान, १८ वर्षांवरील मुलामुलींना पुनर्वसन लाभ देण्यात यावा. तांबी, वासोटा गावासह प्रत्येक गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करावी. देवस्थान, इनाम जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आठ दिवसांत आम्ही वरिष्ठ स्तरावर बैठकीचे आयोजन करत आहोत. सह्याद्रीतील या प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.- किरण जगताप, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर</p>