Maharashtra Corona : राज्यात रुग्णसंख्या पुन्हा घटली, रिकव्हरी रेट वाढून ९३.२४ टक्क्यांवर!

राज्यात सातत्याने नव्या करोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असून हा आकडा आता २० हजारांच्या घरात आला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट देखील ९३ टक्क्यांच्या वर गेला आहे.

corona cases
(संग्रहित छायाचित्र)

संपूर्ण एप्रिल महिना वेगाने वाढणारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मे महिन्याच्या शेवटाकडे येता येता उतरू लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने सापडणाऱ्या करोनाबाधितांची संख्या सातत्याने ३० हजारांच्या खालीच राहात असून ती आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण २० हजार ७४० नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० इतका झाला आहे. मात्र, त्यातले फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, राज्यातील मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या खाली उतरला आहे. आज दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर १.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा नियंत्रणात कसा आणता येईल आणि मृत्यू टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. आजच्या आकड्यांची भर पडल्यानंतर राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ इतका झाला आहे.

 

दरम्यान, मुंबईतील आजच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आज दिवसभरात ९२९ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यासोबत १२३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, त्याचवेळी ३० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, मुंबईतली आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३ हजार ४६१ इतकी झाली आहे. त्याचवेळी बऱ्या झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ६ लाख ५८ हजार ५४० इतका झाला आहे. तर मृतांची एकूण संख्या १४ हजार ८०८ इतकी झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Todays corona patients in maharashtra shows decline in corona cases also improves recovery rate pmw

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या