राज्याच्या सत्तासंघर्षादरम्यान महत्त्वाच्या असलेल्या आमदार अपात्रतेची सुनावणी नुकतीच पार पडली. आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष होतं. एकूण ३४ याचिकांवर आज सुनावणी पार पडणार होती. त्यामुळे आमदार अपात्रेबाबत आज मोठा निर्णय येण्याची शक्यता होती. आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणीसाठी वेळापत्रक आखण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. सुनावणी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात आदेश दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून याप्रकरणी सुनावणी होत नसल्याने ठाकरे गटातील आमदारांकडून टीका केली जात होती. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी पहिली सुनावणी पार पडली. तर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये तातडीची दुसरी सुनावणी बोलावली. दुपारी पार पडलेल्या आजच्या सुनावणीचा निर्णय अध्यक्षांनी राखून ठेवला असल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

हेही वाचा >> “भाजपाविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

संजय शिरसाट म्हणाले की, “आमच्या गटाच्या वकिलांना काही पुरावे दाखल करायचे आहेत, त्यावर सुनावणी झाली पाहिजे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. यासाठी आजचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.”

“परंतु, ऑनलाईन सुनावणीबाबत जे स्टेटमेंट येत आहेत यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून दोन्ही वकिलांच्या संमतीने आजचा निर्णय राखून ठेवतोय, पुढच्या वेळेस वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊ असं अध्यक्षांनी आजच्या सुनावणीत सांगितलं. विधानसभा अध्यक्ष प्रेस नोटद्वारे सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करू शकतात. प्रत्येकाचा युक्तीवाद ऐकून घेण्याचं अध्यक्षांनी अशंतः मान्य केलं आहे”, असंही संजय शिरसाट म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढची सुनावणी कधी?

आजची सुनावणी संपली असून पुढची सुनावणी आता १३ ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणी दोन्ही बाजूकडून युक्तीवाद झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीच्या संदर्भात वेळापत्रक जाहीर केले जाईल. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. तर, उद्धव ठाकरे गटाकडून सर्व याचिका एकत्र करण्यासाठी आणि एकच सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. प्रत्येक याचिकांवर वैयक्तिकरित्या सुनावणी व्हावी आणि प्रत्येक याचिकांबाबत पुरावे दिले जातील, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.