मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि सोलापूर या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. सरकारने ३१ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज हंबरडा मोर्चा काढला. हंबरडा मोर्चात लक्षवेधी ठरलं ते उद्धव ठाकरेंचं भाषण. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी २०२९ मध्ये महायुतीतले तिन्ही पक्ष वेगळे लढतील कारण महापालिकेत शिंदे चालतील पण अजित पवारांची राष्ट्रवादी नको असं भाजपाच्या नेत्यांनी म्हटल्याचं कळतं आहे. पाहुया दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी
१) उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टरबूज म्हणत केलं लक्ष्य
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. पण आता एका शेतकऱ्याने सांगितले की, साहेब हातात टरबूज दिलं. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
२) ठाकरेंचा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नव्हताच-संजय शिसाट
छत्रपती संभाजीनगर येथे आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर “हंबरडा मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लातुरात तीव्र प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, “हा मोर्चा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नव्हता, तर शेतकऱ्यांचा हंबरडा कसा फोडतात याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी होता. शेतकऱ्यांची खरी मदत करण्याऐवजी हा मोर्चा केवळ इव्हेंट म्हणून राबवण्यात आला.” त्यांनी पुढे सांगितले की, “ठाकरेंच्या शिवसेनेने आतापर्यंत कधीच कोणाला मदत केली नाही. या संकटाच्या काळात तरी शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे यायला हवे होते, पण त्याऐवजी मोर्चाचे राजकारण करण्यात आले. इव्हेंटशिवाय या मोर्चाला कोणताही अर्थ नव्हता,” असे त्यांनी म्हटले.
३) मविआच्या नेत्यांसह राज ठाकरे निवडणूक आयुक्तांना भेटणार-संजय राऊत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची १४ ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
४) महायुतीत ऑल इज नॉट वेल? रोहीत पवारांचा आरोप काय?
भाजपाचा एका बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकवेळ युतीसाठी एकनाथ शिंदे चालतील पण अजित पवार नकोत असं म्हटलं आहे अशी माहिती समोर आली. यामुळे महायुतीत सारंकाही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान या सगळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. रोहीत पवार म्हणाले की २०२९ ला हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील असंच दिसून येतं आहे. ३० लाख लाडक्या बहिणींची नावं कमी केली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव खराब होतं आहे. देवेंद्र फडणवीस यांना हेच हवं असेल. अजित पवारांच्या बाबतीतही हेच घडतं आहे. अजित पवारांच्या पक्षाचे नेते अडचणीत आले आहेत. अजित पवार अर्थमंत्री असले तरी त्यांची प्रत्येक फाईल एका अधिकाऱ्याकडे जाते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जाते. त्यामुळे २०२९ ला तिन्ही पक्ष वेगळे लढतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं असं रोहीत पवार म्हणाले आहेत.
५) सचिन घायवाळ प्रकरणात योगेश कदमांनी आरोपांवर काय दिलं उत्तर?
सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, विरोधकांची जोरदार टीका सुरू आहे. दरम्यान त्यानंतर आज योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. समोर आलेल्या माहितीनुसार आपली चूक नसेल तर घाबरायचं नाही, विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना म्हटलं आहे. त्यानंतर कदम यांनी ट्विटवर पोस्ट करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ‘२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते. पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खासगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं. असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.