पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. बैठकीस राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील होते. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विविध मुद्यांबाबत पत्रकारपरिषद घेत माहिती दिली. दरम्यान यावेळी माध्यम प्रतिनिधीने त्यांना विरार दुर्घटनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारल्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी “शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील”, असं बोलत याबाबत स्पष्टीकरण दिले.

टोपे म्हणाले, “माध्यमं देखली मला पाहत आहेत व राज्यातील जनता देखीप पाहते आहे. माझ्यावर आलेल्या अतिदुःखाच्या प्रसंगात देखील मी माझं कर्तव्य व जबाबदारीला नेहमीच महत्व दिलेलं आहे. मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या मनात जे विचार असतात, ते नेहमी सामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी मी संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत आलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं माध्यमांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तुम्ही मला आजच पाहात आहात असं नाही, वर्षभरापासून कोविड काळात देखील पाहात आहात. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देणारा मंत्री मीच होतो. सर्व माध्यमांना मी प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये स्पष्ट सांगितलं की ही अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना आहे. मनाला व हृदयला अतिशय पिळवटून टाकणारी घटना आहे. मृत्यू झालेल्यांच्या परिवारातील लोकांच्या दुःखाद आम्ही मनापासून सहभागी आहोत. या सगळ्या परिस्थितीत जे काही शासनाने करणं शक्य आहे ते सर्व आम्ही करणार आहोत. हे सगळं मी सकाळीच सर्व माध्यमांना सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टींची कडक तपासणी होईल, जिथे निष्काळजीपणा आढळून येईल तिथे कारवाई होईल. मात्र शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील.” असं टोपेंनी यावेळी सांगितलं.

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये करोनाची बाधा झालेल्या १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असं असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटल्याचं समोर आलं होतं.

“राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

“पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडिसिविरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही राष्ट्रीय बातमी नाहीय. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत,” असं टोपे म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असं पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं.