हर्षद कशाळकर

हजारोंवर बेरोजगारीचे संकट; कर्ज हप्ते भरण्यात सवलत देण्याची मागणी

करोनाच्या धास्तीने कोकणातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक अडचणीत सापडले असून, या व्यवसायाशी निगडीत हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे.

रायगड जिल्ह्यतील माथेरान, अलिबाग, आक्षी, नागाव, काशिद, किहीम, मांडवा, हरीहरेश्वर, दिवेआगर, मुरुड येथील पर्यटन उद्योग बंद आहेत. समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना येण्यास मज्जाव  आहे.  मुंबई ते मांडवा आणि रेवस ते भाऊचा धक्का दरम्यानची जलवाहतुक बंद करण्यात आली आहेत. किल्ले रायगडाचे दरवाजे बंद पर्यटकांसाठी बंद झाले आहेत. हॉटेल्स, खानावळी बंद झाल्या आहेत.

जिल्ह्यतील पर्यटन व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पर्यटकांचा ओघ थांबल्याने व्यवसायावरचे आर्थिक संकट  गडद झाले आहे.

बेरोजगारीची कुऱ्हाड व्यावसायिक आणि नोकरदार वर्गावर कोसळणार आहे. परीक्षांचा हंगाम संपल्यावर कोकणातील पर्यटन व्यवसायाला तेजी येत असते. राज्यभरातून पर्यटक कोकणात दाखल होत असतात. मात्र ऐन हंगामाच्या सुरवातीलाच व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याने व्यवसायिकांची आर्थिक कोंडी होण्यास सुरवात झाली आहे.

तीस हजार कुटुंबांना फटका

या व्यवसायासाठी स्थानिकांनी मोठय़ा प्रमाणात कर्ज घेतली आहेत. आता व्यवसायातून मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे.जुन महिन्याच्या सुरवातीला कोकणात पावसाला सुरवात होते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ मंदावतो. त्यामुळे पुढील सहा महिने अशीच स्थिती राहणार काय?याची धास्ती व्यावसायिकांना आहे. रायगड जिल्ह्यतील तीस ते चाळीस हजार कुटुंबाना याचा फटका बसेल असा अंदाज आहे.

परिसरात पर्यटनातून हजारो रोजगार

अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, धोकवडे आणि मांडवा लहान मोठे तीन ते साडे तीन हजार हॉटेल, लॉजेच आणि कॉटेज व्यवसायिक आहेत. यातून साधारण १२ ते १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. या शिवाय समुद्र किनाऱ्यांवर बोटींग आणि घोडागाडी व्यवसायिक, लहान मोठे खाद्यप्रकारांची विक्रीकरणारे स्टॉल धारक यांचे व्यवसायही पुर्णपणे बंद पडले आहेत.

अनेक जणांनी व्यवसायासाठी लाखो रुपयांची कर्ज घेतली आहेत. या कर्जांची वसुली सुरुच राहील. पण व्यवसायातून मिळाणारे उत्पन्न मात्र बंदच राहील, यामुळे व्यवसायिकांची आर्थिक कोंडी होईल, त्यामुळे किमान शासनाने बँकाना पुढील दोन महिने कर्जाचे हप्ते भरण्यात सूट द्यावी .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– निमिश परब, अध्यक्ष अलिबाग तालुका कृषी पर्यटन विकास संस्था