वाई : महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर माकडाला चिप्स देताना खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दरीबाहेर काढले. जखमी नेहते हे माकडाला चिप्स देताना कठड्यावरून पाय घसरून सोमवारी दुपारी दरीत कोसळले.

संदीप नेहते (सध्या बावधन,पुणे,मूळ मध्यप्रदेश) हे पुणे येथून कुटुंबीयांसह हरिहरेश्वर (जि. रायगड) येथे पर्यटनास गेले होते.तेथून आंबेनळी घाट रस्त्यामार्गे महाबळेश्वर पर्यटनास येत होते.त्यांना जननी माता मंदिरावरील बाजूस रस्त्यानजीक असलेल्या कठड्यावर काही माकडे दिसली. संदीप हे गाडीमधून उतरून या माकडांना चिप्स खायला देण्यासाठी दरीवर असलेल्या कठड्यावर उभे राहिले. रिमझिम पावसाने कठड्यावर आलेल्या शेवाळा वरून त्यांचा पाय घसरल्याने ते थेट शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळले. याची माहिती महाबळेश्वर पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवानांना समजताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संततधार पावसात तीन तासांच्या प्रयत्नानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या  जवानांनी नेहते यांना सुखरूप दरीबाहेर काढले. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे पाठविण्यात आले.या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, माजी नगरसेवक कुमार शिंदे, संतोष शिंदे, सतीश ओंबळे,अमित कोळी, जयवंत बिरामणे, सुनील केळगणे,  बाळासाहेब शिंदे, सौरभ साळेकर, अमित झाडे, सौरभ गोळे, अनिकेत वागदरे, सर्यकांत शिंदे यांच्यासह महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत आदींनी याकामी परिश्रम घेतले.