१ हजार चौरस किलोमीटरच्या वर विस्तीर्ण  प्रदेशात पसरलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची शानच. पण या व्याघ्र प्रकल्प मध्ये एक मोठी अडचण आहे. म्हणजे तिथल्या घनदाट जंगलांमध्ये आणि वनराईमध्ये राहणारे वाघच नाहीत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण कदाचित ही परिस्थिती आता बदलू शकते. मागच्या आठवड्यात काही पर्यटकांनी आपल्याला कोयना धरणाच्या परिसरामध्ये दोनदा वाघ दिसल्याचा दावा केला आहे. १,१६५.५६ चौरस किलोमीटर वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होतो. कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान याचा समावेश या व्याघ्र प्रकल्पात आहे.

कोयना वन्यजीव अभयारण्यात पुरेशा तृणभक्षक प्राण्यांचा अभाव आणि अन्य कारणांमुळे या व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थायिक होऊन पिल्लांना जन्म देणारे वाघ नाहीत. त्यामुळे वाघ पहिल्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली तर ही फार मोठी घटना मानावी लागेल.

मे २००८ मध्ये पहिल्यांदा चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघाचा फोटो आढळला. यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळच असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य मध्ये सुद्धा असाच एक वाघ कॅमेरा ट्रॅप मध्ये आढळला होता. पण अद्याप पर्यंत डोंगराळ भाग, कडेकपाऱ्या आणि प्राण्यांचे पुरेसे अस्तित्व नसलेल्या कोयनेमध्ये वाघाचे अस्तित्व अलीकडच्या काळात तरी आढळले नव्हते. अर्थात अगदी इंग्रजांच्या कालखंडापर्यंत या भागामध्ये वाघांचे अस्तित्व होते ही गोष्ट नमूद करायला हवी.

२१०४ च्या व्याघ्र गणनेत सह्याद्रीमध्ये साधारणपणे पाच ते आठ वाघांचे अस्तित्व आढळून आले होते. पण हे वाघ सह्याद्रीमध्ये राहून पिल्लांना जन्म देत नाहीत अगदी काही काळासाठी येतात आणि जातात.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन्यजीव संरक्षक सत्यजित गुजर यांनी अशी माहिती दिली की गेल्या आठवड्यात काही पर्यटकांनी कोयना धरणाच्या ‘बॅकवॉटर’ मध्ये आपल्याला दोनदा वाघ दिसला असल्याचा दावा केला होता. हे पर्यटक होडीने वासोट्याच्या दिशेला जात असताना त्यांना वाघाचे दर्शन झाले असल्याचा दावा त्यांनी केला. महत्त्वाचं म्हणजे लाँच चालकाने सुद्धा हा प्राणी वाघच असल्याचे म्हटले आहे.

“पण त्याची अद्याप पर्यंत पुष्टी होऊ शकलेली नाही. आम्ही तिथे कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत. या कॅमेरामध्ये अजून पर्यंत वाघाचे फोटो आले नसले तरीसुद्धा एक मोठ्या आकाराचा बिबट्या मात्र दिसला आहे,” असे गुजर म्हणाले. कदाचित पर्यटकांना हा मोठ्या बिबट्या वाघ वाटला असावा, पण हे नंतरच स्पष्ट होईल.

तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून या प्रकल्पाच्या प्रशासनाने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून कात्रज उद्यान व सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातून सह्याद्रीमध्ये सांबर व चितळ यांच्यासारखे प्राणी सोडण्याची परवानगी मागितली आहे. पुणे संरक्षण मिळाल्यामुळे इथे वाघ येऊन स्थायिक होऊ शकतात.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये होत असलेल्या बॉक्साईट उत्खननामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याच्या दक्षिणेतील वाघांचे अधिवास जसे की कर्नाटकातील काली व्याघ्रप्रकल्प यांच्यातला दुवा तुटला आहे किंवा विखंडित झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतून वाघ या व्याघ्र प्रकल्पात येत नाहीत. सिंधुदुर्गातल्या तिल्लारी भागांमध्ये प्रजनन करणाऱ्या वाघांची नोंद झाल्यामुळे तो भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडला जावा अशी प्रशासनाची इच्छा आहे. या अधिवासाचा विकास केल्यास तिथे वाघ सह्याद्रीमध्ये येऊन त्याला आपले घर करू शकतात. पण इथे असलेल्या काही परप्रांतीय बागायतदारांच्या व त्यांच्या कह्यात असणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही असा दावा वनखात्यातील काही ज्येष्ठ अधिकारी करतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists claim that tiger seen in the sahyadri tiger project scj
First published on: 28-12-2019 at 16:23 IST