लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : पाकिस्तानातील अतिरेक्यांपेक्षा भारतात राहणारे गद्दार अतिधोकादायक आहेत. गावागावांत मतांच्या राजकारणातून हे गद्दार पोसले जात आहेत. अशांपासून सावध राहायला हवे, असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत व्यक्त केले.

हिंदू एकता आंदोलनच्यावतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन सांगलीतील मारुती चौकामध्ये सायंकाळी करण्यात आले होते. या वेळी आ. पडळकर बोलत होते. यावेळी पत्रकार सुरेश चव्हाणके, पृथ्वीराज पवार, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना आ. पडळकर म्हणाले, महाराष्ट्र घुसखोरमुक्त करण्याचा संकल्प या मेळाव्याच्या निमित्ताने करुया. घुसखोर बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची गरज आहे. तथाकथित पुरोगामी शक्तीकडून हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. हे थोपविण्याची गरज आहे. मतांच्या राजकारणातून गद्दारांना पोसण्याचे काम आपण एकजुटीने थांबवुया.

यावेळी बोलताना पत्रकार चव्हाणके यांनी देशात घुसखोरांची संख्या १० कोटी असल्याचे सांगत सांगलीत सुमारे ३ लाख घुसखोर असल्याचा दावा केला. केवळ कायदा करून हा प्रश्न मिटणार नाही, तर यासाठी जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागेल.

प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले, क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर लावण्यात आलेला फलक काढून त्याठिकाणी औरंगजेबाचे थडगे असा फलक लावला पाहिजे. थडग्यावर गलेफ, फुले वाहण्यास सरकारने प्रतिबंध करावा. औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान आहे. हा अपमान हिंदू सहन करणार नाहीत.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत हिंदू एकता जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केले. यावेळी हिंदू एकताचे मनोज साळुंखे, प्रा. विनया कुलकर्णी, अविनाश मोहिते यांची भाषणे झाली.