सांगली : सांगलीत झाडाची फांदी विनापरवाना तोडत असताना बारा पाखरांचा मृत्यू झाला तर तीन पाखरे गंभीर जखमी झाली. संरक्षित पक्ष्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वन विभागाने सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना झाडांची फांदी तोडल्याप्रकरणाची महापालिकेने गंभीर दखल घेऊन संबंधितांना आज नोटीस बजावण्यात आल्याचे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले.
सांगली कर्नाळ रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ पिंपळाचे मोठे झाड आहे. नदीजवळ असल्याने पिंपळाचे झाड रातबगळा या पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. रविवारी या झाडाची फांदी कटरने तोडण्यात आली. यामुळे फांदीवर असलेली रातबगळ्यांची आठ घरटी जमीनदोस्त झाली. घरट्यातील अंडी व पिले रस्त्यावर पडल्याने काही अंडी फुटली तर नवजात अकरा पिले जागीच ठार झाली. एक रातबगळाही यात मृत्युमुखी पडला. तर तीन पक्षी जायबंदी झाले असून त्यांना उपचारासाठी वन विभागाच्या हवाली करण्यात आले आहे. मानद वनजीव रक्षक अजित पाटील, प्राणिमित्र मुस्तफा मुजावर, सचिन साळुंखे, प्रदीप सुतार आदींनी या दुर्घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमी पाखरांना उपचार तत्काळ मिळावेत यासाठी प्रयत्न केले. वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेल्या तीन पक्ष्यांपैकी दोन पक्ष्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेची वन विभागाने गांभीर्याने दखल घेत रातबगळ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द वन गुन्हा दाखल केला असल्याचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडीकर यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास वनपाल तुषार भोरे करत असून तपासात दोषींची नावे निष्पन्न करून त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, विनापरवाना झाडांची फांदी तोडल्याप्रकरणी संबंधीतांना नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसांत खुलासा करण्याची सूचना नोटीसमध्ये देण्यात आल्याचे महापालिकेचे उद्यान अधीक्षक पाठक यांनी सांगितले. समाधानकारक खुलासा वेळेत मिळाला नाही तर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.