सोलापूर : बेजबाबदार मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा वाढता ऱ्हास रोखण्यासाठी आणि वृक्षारोपण चळवळीला हातभार लावण्यासाठी सोलापुरात क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे अनोखे अभियान राबविण्यात आले आहे. सामन्यातील प्रत्येक षटकार आणि गडी बाद केल्यावर एका केशर आंबा वृक्षाचे रोप बक्षीस मिळणार असल्याने खेळातून वृक्षलागवड चळवळ आकार घेत आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

वृक्षारोपणाच्या प्रसाराची संकल्पना घेऊन सोलापुरात दयानंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संजीवनी सोशल फाउंडेशन या संस्थेने प्रौढांसाठी संजीवनी कॉर्पोरेट प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा चाळिशीपार अशी होती.

या क्रिकेट स्पर्धेत आयुर्वेद डॉक्टर, सनदी लेखापाल, वकील, पोलीस, शिक्षक आदी संघांसह महालक्ष्मी ज्वेलर्स, गणेश ज्वेलर्स असे मिळून आठ संघ उतरले होते. दोन शनिवार आणि दोन रविवारी हे क्रिकेट सामने खेळले गेले. अंतिम सामना गणेश ज्वेलर्स आणि महालक्ष्मी ज्वेलर्स या दोन संघांमध्ये झाला. गणेश ज्वेलर्स संघाने विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेच्या एकूण मालिकेत १४२ गडी बाद झाले. तसेच ९३ षटकार ठोकण्यात आले. त्याप्रमाणे एकूण २३५ केशर आंबा वृक्षरोपांची बक्षिसे खेळाडूंना निश्चित करण्यात आली. या बक्षीसरूपी २३५ केशर आंबा वृक्षांची लागवड एकाच परिसरात करून केशर आंब्याची बाग निर्माण करण्याचे नियोजन येत्या जून महिन्यात संजीवनी सोशल फाउंडेशनकडून होणार आहे. ही अनोखी संकल्पना ‘संजीवनी’चे संस्थापक-अध्यक्ष राकेश उदगिरी यांनी विशद केली.

या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आणि डॉ. व्ही. पी. उबाळे यांच्यासह सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे आणि दयानंद शिक्षण संकुलातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. तर प्रातिनिधिक बक्षीस वितरण सोहळ्यास अरविंद साका व नीलेश धाराशिवकर आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृक्षारोपण चळवळ वाढावी

अलीकडे सर्वत्र पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. रस्ते रुंदीकरण, वाढते शहरीकरण, बांधकामे यामुळे वारेमाप वृक्षतोड होत आहे. त्याबद्दल समाजात जागृती होण्यासाठी क्रिकेट स्पर्धेला जोड देऊन वृक्षारोपणाची संकल्पना राबविण्याचा विचार कृतीत आणला आहे. या संकल्पनेला मित्र परिवाराने उचलून धरले आहे. –राकेश उदगिरी, संस्थापक-अध्यक्ष, संजीवनी सोशल फाउंडेशन, सोलापूर