हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : रायगड जिल्ह्यात करोना काळात क्षयरुग्णांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदीमुळे क्षयरोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण घटले असून, मृत्युदरही घटला आहे. जिल्ह्यात २०१८ मध्ये ४ हजार ७२६ तर २०१९ मध्ये ४ हजार ८६४ क्षयरोगी आढळून आले होते. त्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यात ३ हजार ३०१ तर या वर्षी ऑक्टोबर २०२१ अखेपर्यंत २ हजार ७९४ आढळून आले आहेत. गेल्या दोन वर्षांत क्षयरोगाचे प्रमाण जिल्ह्यात घटल्याचे दिसून येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केली. जवळपास सहा महिने हे निर्बंध लागू होते. या वर्षांच्या मार्चमध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा  निर्बंध लागू करण्यात आले. हे निर्बंध सप्टेंबर अखेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात लागू होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधाने जसा करोनाबाधितांची संख्या रोखण्यास मदत झाली. त्याच प्रमाणे क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

गर्दीच्या ठिकाणी तसेच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणी क्षयरोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग या तालुक्यांत क्षयरोग्यांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त असते. मात्र करोना काळात या तालुक्यांमधील क्षयरोग्यांचे प्रमाण घटले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे औषधोपचाराला दाद न देणाऱ्या क्षयरोग प्रकारातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यात एमडीआर प्रकारातील २०९ क्षयरोगी आढळून आले होते यातील २६ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये एमडीआर प्रकारातील १७२ रुग्ण आढळून आले.

यातील १६ जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये १३७ एमडीआर क्षयरोगी आढळले, यातील १० जणांचा मृत्यू झाला. तर २०२१ मध्ये ऑक्टोबर अखेपर्यंत एकूण ११६ एमडीआर प्रकारातील क्षयरोगी आढळले, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील क्षयरोग्यांचे प्रमाण घटले आहेच, मात्र त्याच वेळी क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.

१५ ते २५ नोव्हेंबर कालावधीत शोध मोहीम..

जिल्ह्यात क्षयरोग बाधितांचा शोध घेण्यासाठी १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी २१६ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन ही पथके क्षयरोग्यांचा शोध घेणार आहेत. या दहा दिवसांत जवळपास ८५ हजार ८८९ घरांना भेटी दिल्या जाणार असून ४ लाख २९ हजार ४४७ जणांची क्षय तपासणी केली जाणार आहे. ४३ पर्यवेक्षकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील क्षयरोग्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्युदरही ५ टक्क्यांवर आला आहे. २०२५ पर्यंत जिल्हा क्षयरोग मुक्त व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी रुग्ण शोध मोहिमांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. क्षयरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांनी आपली तपासणी करून घ्यावी.

डॉ. सुरेश देवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी. रायगड