छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी, माहुरच्या रेणुकामाता आणि अंबाजाेगाईच्या योगेश्वरीच्या मंदिरात ‘आई राजा’ उदोकरात घटस्थापना करण्यात आली. शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मंत्रोच्चार, पारंपरिक वाद्यांच्या निनादात घटस्थापनेचा विधी पार पडला.
तुळजापूर नगरीत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन, पोलीस विभाग, नगर परिषद, महसूल प्रशासन तसेच आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व राज्य परिवहन महामंडळ या विभागांकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
घटस्थापना सोहळ्याला आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सौमय्याश्री पुजार, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत बजाजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह पुजारी बांधव उपस्थित होते. घटाचे पूजन करून धान्य टाकून बीजोत्पादन करण्यासाठी कोणते बियाणे योग्य हे ठरविण्यासाठी हा विधी केला जात असावा, अशी धारणा आहे.
घटस्थापनेचे महत्त्व
घट बसविण्याची जागा ही सिंहाच्या गाभाऱ्यात देवीच्या डाव्या बाजूला असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीतुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या जमिनीतील माती घटस्थापनेकरिता आणली जाते. त्या मातीला वावरी असेही म्हणतात. प्रथेप्रमाणे धाकटे तुळजापुरातील कुंभार कुटुंबीयांकडून कलश येतो. या कलशामध्ये गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते. जिल्हाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गोमुख तीर्थाजवळ गंगा आवाहन केले जाते. त्यानंतर वाजतगाजत घट कलश सिंहाच्या गाभाऱ्यात आणून प्रतिष्ठापित केला जातो. तसेच शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य (जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका व सातू) दिले जाते.