छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचं तुळजाभवानी मातेचे ऑनलाइन दर्शनादरम्यान दिसून येत आहे. गुजरात मधील भावनगर येथील हितेश भाई जानी या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून उंदरांना तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांना विचारले असता ते म्हणाले, ही बाब माझ्याही कानावर आली आहे. पुरातत्व विभागाचे मंडप दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे त्यांनाही या पुढे असे घडणार नाही, याची काळजी घ्यायला सांगू.

गुजरात मधील भावनगर येथील भाविकाला देवीच्या दागिन्यांवर उंदिर दिसला. यामुळे मूर्तीचे वा दागिन्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. मंदिरातील स्वच्छतेबाबत नेहमीच प्रश्न उभे केले जातात.

दरम्यान मंदिराचा कळस उतरवायचा की नाही यावरुनही नवा पेटला आहे. जुन्या मंदिराचे काम उतरवून नवा कळस चढवावा की नाही, या विषयी भारतीय पुरातत्त्व विभागाने अहवाल द्यावा, अशा सूचना देण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथील अधीक्षकांनी पाहणी केली आहे. या तिघांचा एकत्रित अहवाल आल्यानंतर याचा निर्णय होऊ शकेल, असे राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी ‘ लोकसत्ता’ बोलताना सांगितले.

तुळजापूर मंदिर विकास आराखड्यानंतर देवीची एक मूर्ती रामदरा तलावाजवळही उभी केली जाणार आहे. ती मूर्ती अष्टभूजधारी असावी की नाही यावरुन वाद सुरू होते. विकास आराखड्यानुसार तुळजाभवानी मंदिराचा कळस सोन्याचा करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. अशा काळात थेट भवानी मूर्तीच्या अंगावर मूषक दिसल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजाभवानी मंदिराच्या नव्या आरखड्यासाठी राज्य सरकारने १८६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मंदिर आरखड्यानुसार मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या काही दुकाने व निवासस्थानेही काढावी लागणार आहेत. त्याच्या भूसंपादनासही निधी मिळाला असला तरी भूसंपादनाचे दर अद्यापि ठरलेले नाहीत. सर्वाधिक दर दिले जातील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मंदिराचा कळस काढण्यास आपला विरोध असल्याचे जितेंद्र आव्हाडही तुळजापूर येथे येणार असल्याचे सांगण्यात आले.