छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू गंगणे यास तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी या वृत्तास दूजोरा दिला. या प्रकरणी भाजपची बदनामी होत असतानाही गंगणे यांच्या नावाला पक्षाकडून देण्यात आलेली पसंती भुवया उंचवायला लावणारी आहे.

दरम्यान या प्रकरणात पिटू गंगणे यांनी या प्रकरणात पोलिसांना मदत केल्याचा दावा भाजपच्या वतीने केला जात आहे. तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे आहेत. या प्रकरणात आरोपीस राजश्रय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस राजाश्रय दिला जात असल्याबाबतचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविले होते. मात्र, पत्रात निर्देशित केलेले आराेपी पिटू गंगणे नाहीत, असेही सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर नगरपालिकेवर पिटू गंगणेंचा वरचष्मा आहे. त्यांच्यावर या पूर्वीही अवैध धंद्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल होते. अशा व्यक्तीस उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून द्यावयाचा ‘ एबी’ फॉर्म पिटू गंगणे यांना दिला आहे. ते ड्रग्ज तस्करीमध्ये नव्हते तर त्यांनी सेवन केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यांच्यामुळेच पोलिसांना या प्रकरणाची पाळेमुळे बाहेर काढता आल्याचाही भाजपचा दावा आहे.

तुळजापूरमध्ये ४० ग्राम ड्रग्ज सापडल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. या मतदारसंघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप वारंवार केला गेला. मात्र, तुळजापूर नगरपालिकेत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून पिटू गंगणे यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. अंमली पदार्थ तस्करी वेगळी आणि त्याचे सेवन हे दोन स्वतंत्र गुन्हे आहेत त्यातील सेवनाचा गुन्हा सौम्य असल्याचा दावाही केला जात आहे.

दरम्यान अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये ड्रग्ज प्रकरणात आरोपी असणारे सर्वपक्षीय कार्यकर्ते असल्याचाही दावा केला जात आहे. यातील संतोष परमेश्वर हे माजी नगराध्यक्ष असून एवढे दिवस ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. आता ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना, भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे तसेच कॉग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांपैकी अनेक जण अंमली पदार्थ प्रकरणात आरोपी होते. त्यामुळे तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपीची गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

‘‘खरे तर ज्या व्यक्तीवर आंमली पदार्थ सेवनाचा आरोप आहे त्याला राजकीय क्षेत्रात प्रवेश देऊन राजाश्रय देण्याचे कारणच काय असावे. जर पिटू गंगणे निर्दोष असतील तर एक महिना कोठडीत तो आरोपी का होता ? एखादी व्यक्ती न्यायालयात निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला राजकीय मंचावर घ्यायचे की नाही, असा प्रश्न आहे. काही नैतिकता सर्वांना पाळायला हवी. पण आता ती दिसून येत नाही. या प्रकरणातील दोषारोप पत्र नीट वाचले तरी बरेच चि़त्र स्पष्ट होईल. – ओम राजेनिंबाळकर, खासदार, धाराशिव, शिवसेना (उद्धव ठाकरे).