सांगली : आटपाडी येथील उत्तरेश्वर देवाच्या कार्तिकी यात्रेत चार कोटींची उलाढाल झाली. यात्रेनिमित्त बाजार समितीमार्फत आयोजित शेळ्या-मेंढ्यांचे प्रदर्शनात सोमनाथ शंकर जाधव-माळी यांच्या पाच वर्षांवरील बकऱ्याने हिंदकेसरी पुरस्काराला गवसणी घालत, बुलेट मोटारसायकल बक्षीस देखील प्राप्त केले. पैदाशीच्या मेंढ्यांना दोन लाखांपासून पाच लाखांपर्यंत दर मिळाला.

पश्चिम महाराष्ट्रात शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्यांच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या आटपाडीच्या यात्रेत मोठ्या संख्येने जनावरांची आवक झाली. बुधवारी आणि गुरुवारी शेळ्या, मेंढ्या आणि बकऱ्यांच्या यात्रेत १० हजारांवर जनावरांची आवक झाली. यात्रेत चार कोटींची उलाढाल झाली. लहान बकऱ्यांना २५ ते ५० हजार तर पैदाशीसाठी उपयुक्त मेंढ्यांना २ लाखांपासून ५ लाखांपर्यंत दर मिळाला.

हौशी शेतकरी जातिवंत आणि दर्जेदार मेंढ्या आणि बकऱ्यांना झुली पांघरून, वाद्याच्या गजरात बाजारात घेऊन दाखल झाले होते. प्रदर्शनात पाच वर्षांच्या वरील गटात सोमनाथ जाधव यांच्या आठ वर्षांच्या माडग्याळ जातीच्या जातिवंत आणि देखण्या बकऱ्याला हिंदकेसरी पुरस्कार आणि बुलेट मोटारसायकल देऊन गौरवण्यात आले. उपस्थित यात्रेकरूंनी यावेळी बकरामालक जाधव आणि सभापती संतोष पुजारी यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला आणि वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण करत मेंढ्यासह जेसीबीमधून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, सचिव शशिकांत जाधव, संचालक आणि कर्मचाऱ्यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची विजेची चांगली सोय केल्याने समाधान व्यक्त होत आहे.