विरार मधील बहुचर्चित समय चौहान हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी गोळीबार करणार्‍या दोन कुख्यात गुंडाना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या हत्या प्रकरणातील एक आरोपी आठवड्याभरापूर्वीच पोलीस चकमकीत मारला गेला आहे.

विरारमध्ये राहणार्‍या समय चौहान या व्यावसायिकाची २६ फेब्रुवारी रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले होते. त्यात दोन मारेकरी दिसत होते. परंतु ते कोण, कुठून आले याचा काहीच उलगडा होत नव्हता. या प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते. शिवसेना नेते सुदेश चौधरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्लेखोरांच्या अटकेसाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. स्वत: पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील हे पोलीस निरिक्षक प्रफुल्ल वाघ आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्यासह उत्तर प्रदेशात आरोपींच्या शोधासाठी गेले होते. मंगळवारी वाराणसी जिल्ह्यातील चित्तापूर चौकातून पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या मदतीने राहुश शर्मा आणि अभिषेक सिंग यांना अटक केली आहे. याप्रकरणातील तिसरा आरोपी मनिष सिंग या २१ मार्च रोजी उत्तर पोलिसांबरोबर झालेल्या पोलीस चकमकीत मारला गेला होता. तर चौथा आरोपी फरार आहे

३ हत्या आणि ९ वर्षांपासून फरार

पोलिसांनी अटक केलेला राहुल शर्मा हा कुख्यात गुंड असून त्याने ३ हत्या केल्या आहेत. मागील ९ वर्षांपासून तो फरार होता. त्याने वांद्रे येथे अजिल शेख आणि विजय पुजारी तर भाईंदर मध्ये बंटी प्रधान या तिघांच्या हत्या केल्या होत्या. या दोन्ही आरोपींना बुधवारी वसईत आणले जाणार आहे. त्यांना नेमकी कुणी हत्येची सुपारी दिली ते पुढील चौकशीत स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

..अखेर सत्याचा विजय झालाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात शिवसेना नेते सुदेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले होते हे आता सिध्द झाले आहे. सत्याचा उशीरा का होईना विजय होतोच, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी सत्य शोधून काढले आणि मला नाहक अडकविणार्‍यांना सणसणीत चपराक दिली आहे, असे त्यांनी सांगितले.