अहिल्यानगर : स्कॉर्पिओ गाडीला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) बनावट लोगो लावून आरटीओ अधिकाऱ्याचा बनावट गणवेश परिधान करून वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या दोघा तोतया आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा तोतयांना बीड पोलिसांनी अटक केली. बीडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील आरटीओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- अहिल्यानगर येथील केवल जग्गी यांच्या मालकीची मालमोटार घेऊन चालक अशोक पांचाळ हे बीडकडे जात होते. देवराई (ता. पाथर्डी) येथे त्यांच्या पाठीमागून ‘आरटीओ’चा लोगो लावलेली स्कॉर्पिओ आली व त्यांनी चालकास ‘तुझ्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र संपले आहे, तुला ६४ हजार रुपये दंड भरावा लागेल’, असे सांगितले.
त्यामुळे चालकाने जग्गी यांना दूरध्वनी केला. जग्गी यांना त्यांनी २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. परंतु जग्गी यांना संशय आल्याने त्यांनी मोटरमालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क साधला. सानप यांच्याशी बोलताना तोतयापैकी एकाने आपण वडाळा आरटीओमधून सूर्यवंशी बोलतो असे सांगितले. सानप यांना संशय आल्याने त्यांनी अहिल्यानगर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांना या घटनेची माहिती दिली. सगरे यांनी मोटर वाहन निरीक्षक पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले.
पाटील यांनी स्कॉर्पिओ गाडी कोणत्या ठिकाणची आहे, याची चौकशी केली असता तो क्रमांक ठाणे आरटीओ कार्यालयाच्या वाहनाचा असल्याचे समजले. मात्र, वाहन ठाणे कार्यालयातच असल्याची व तेथे सूर्यवंशी नावाचे कोणीही अधिकारी नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघा अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हे दोघे तोतया बीडकडे रवाना झाले होते. त्यामुळे अहिल्यानगर आरटीओ कार्यालयाने बीड आरटीओ कार्यालयाशी संपर्क केला. बीड आरटीओ कार्यालयातील अधिकारी गणेश विघ्ने यांनी या दोघांना वाहनासह ताब्यात घेतले व बीड पोलिसांकडे फिर्याद दिली. चौकशीत या दोघांची नावे अजय गाडगे व दिनेश धनवर असल्याचे निष्पन्न झाले.