भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनाला धडक दिल्याने या अनियंत्रित वाहनाने रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना चिरडले. या अपघातात दोन मजूर ठार झाले, तर तीनजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वणी-घुग्घूस मार्गावरील पुनवट गावातील बस थांब्यासमोर घडली.

राजू देवराव मिलमिले (२७) रा.कोठोडा (ता.केळापूर), महादेव धर्माजी भटवलकर (६५) रा.बेलोरा (ता.वणी) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात सुरेश पांडुरंग जुनगरी (५०), सतीश प्रभाकर गेडाम (३४) दोघेही रा.बेलोरा व पांडुरंग सुधाकर अवताडे (३०) रा.कोठोडा (ता.केळापूर) हे मजूर जखमी झाले. यातील सुरेश आणि सतीश यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वणी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वणी-घुग्घूस या मार्गावरील सिमेंट मार्गावर काही मजूर डागडुजीचे काम करीत होते. यावेळी वणीवरून ट्रक (क्र.एमएच-३२/एफसी ६३९९) ट्रक घुग्घूसकडे भरधाव जात असताना, पुनवट बस थांब्याजवळ ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या बोलेरो वाहनावर जाऊन धडकला. यावेळी बोलेरोमध्येही मजूर बसून होते. ट्रकच्या धडकेने हे बोलेरो वाहन रस्त्यावर काम करित असलेल्या मजुरांच्या अंगावर गेले आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रकचालक वाहनासह पसार झाला. शिरपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.