राजापूर :ऐतिहासिक वारसा असलेल्या राजापूर तालुक्यातील कोतापूर तिठा, धाउलवल्ली आणि पाणेरे तिठा या भागात दोन बारव आणि एक तलाव आढळून आले आहेत. ही बारव आणि तलाव मध्ययुगीन कालखंडातील बांधण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात असून त्या काळातील आदर्शवत जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना बघायला मिळत आहे. हे मध्ययुगीन कालखंडातील असल्याचा पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दुजोरा दिला आहे.

राजापूर-धारतळे मार्गावरील कोतापूर तिठा येथे असणार्‍या प्रवासी मार्ग निवारा शेडच्या मागच्या बाजूच्या जंगलमय भागामध्ये एक बारव ( पायर्‍यांची विहिर) आढळून आली आहे. ही बारव पुर्णत: कातळ खोदून तयार करण्यात आले आहे. हे साधारण ५० ते ६० फुट खोल आहे. या बारवमध्ये एका बाजुने आतमध्ये उतरण्यासाठी पुर्वेकडून पश्चिमेकडे उतरणार्‍या पन्नास पायर्‍या आहेत. नंदा प्रकारातील ही बारव मध्ययुगातील जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना असल्याचे बोलले जात आहे. याच परिसरामध्ये सुमारे ५० ते ६० फुट लांब आणि २५ ते ३० फुट रुंदी असलेला धारतळे येथे तलाव असून हा तलावही नंदा प्रकारातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अलिकडच्या काळामध्ये या तलावाच्या येथे कठडा बांधण्यात आला असून या नव्या बांधकामामुळे या तलावाचे मुळ स्वरुप झाकले गेले आहे. मात्र तरीही त्याच्या जवळ गेल्यावर याची खोदाइ व तत्कालीन बांधकाम शैलीची जाणीव होते. धारतळे पासून सुमारे पाच कि.मी.अंतरावर पाणेरे फाटा येथेही नंदा प्रकारातील बारव आहे. पाणेरे फाटा आणि कोतापूर अशा दोन्ही ठिकाणच्या बारवमध्ये साम्य असल्याचे दिसून येत आहे. पाणेरे फाटा येथील बारव सद्यस्थितीमध्ये पाण्याने पूर्ण भरलेली आहेत. कातळात असणार्‍या बारव व तळींचे योग्य प्रकारे जतन अन् संवर्धन झाल्यास अनेक गावांची पाण्याची समस्या दूर होवू शकते. ही बारव व तळी विनोद पवार यांना आढळून आली असून या शोध मोहिमेमध्ये त्यांना जगन्नाथ गुरव यांचे सहकार्य लाभले आहे. श्री. पवार यांनी केलेल्या या नाविण्यपूर्ण संशोधनाचे कौतुक केले जात आहे.

बारव म्हणजे काय?

कुंड हा वास्तुप्रकाराचा आधारभूत घटक असून या कुंडाच्या वर विशिष्ट पायर्‍या देऊन एक पटांगण सोपान टप्पा ठेवत. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेवून झालेला विस्तार बारव स्थापत्यात पहावयास मिळतो. एकूण एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असते. बारव्यात विविध देवतांची स्थापना केलेली असते. त्यासाठी असलेली देवकोष्ठे सर्वात वरच्या सोपानावर स्वतंत्र अशी किंवा अगदी संरक्षक भिंतीत व प्रवेशमार्गाच्या दोन्ही बाजू ठेवतात. बारवेत चौरस हा आकार प्रामुख्याने असतो. मात्र, आयत व क्वचित अष्टकोनी आकारही पाहावयास मिळतात.

बारवेत एक ते चार मुख्य प्रवेश असतात. एक प्रवेश – चौरस आकार – एक द्वार असलेली वापी म्हणजे विहीर. अशा विहीरीचा आकार आणि त्यातील टप्पे वाढले की, ती बारव या सदरात मोडते. कोकणामध्ये अशा बारवांना काही ठिकाणी घोडेबाव असेही म्हणतात. मध्ययुगीन काळामध्ये विहीर, तलाव, बारव, तडाग, पुष्करणी, वापी असे विविध जलस्त्रोत निर्माण केले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकणामध्ये बारव अस्तित्वात आहेत. त्याच्या स्थापत्याचे अनेक विविध प्रकार आहेत त्यातील अनेक रचना कोकणामध्ये आढळून येतात. गावोगावची लोकसंस्कृती, एकात्मता आणि सामाजिक जीवन त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारव. कोंढेतड येथील वापी व तडाग त्यानंतर कोतापुर, धारतळे व पाणेरे फाटा येथे आढळून आलेल्या बारव व तलाव मध्ययुगीन जलस्थापनेच्या प्रगत दृष्टिकोनाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे जतन अन् संवर्धन होणे गरजेचे आहे.-अनिल दुधाणे, इतिहास संशोधक, पुणे