लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुल़डाणा जिल्ह्यामध्ये करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, गत २४ तासांत आणखी दोन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या १० झाली. आज करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेल्रूा महिला रुग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला, तर एका ७० वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये १९ अहवाल नकारात्मक, एकाचा अहवाल सकारात्मक आला आहे. प्राप्त सकारात्मक अहवाल हा मलकापुरातील मोमिनपूरा भागातील ५५ वर्षीय महिलेचा आहे. त्या महिला रुग्णाचा आजच उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच काल मलकापुरातील काळीपूरा येथील ७० वर्षीय महिला रुग्ण उपचारादरम्यान रुग्णालयात दगावली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये करोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गत काही दिवसांपासून दररोज करोनाबाधितांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे.
बुलडाणा जिल्ह्याात आतापर्यंत एकूण १६६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १२२ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात ३४ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ४४ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत एकूण २२७३ अहवाल नकारात्मक आले आहेत.