सातारा जिल्ह्यात दोन जणांचा नव्यानं प्रसार होत असलेल्या सारी या आजारानं मृत्यू झाला आहे. या रुग्णांना श्वसन संस्थेचा तीव्र जंतूसंसर्ग झाला होता. करोनाचे संशयीत रुग्ण म्हणून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.

करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालय, सातारा येथे ४ मे रोजी रात्री उशिरा आठ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन जणांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे मृत्यु झाला. करोनाचे संशयित म्हणून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित सहा जणांच्या घशातील नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

आणखी वाचा- ‘सारी’चा आजार म्हणजे नेमके काय? लक्षणे आणि उपचार

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २७, कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील दोन आणि फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील ३२ अशा एकूण ६२ जणांचे कोरना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.