समाज कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या एका आश्रमशाळेतील शिक्षिकेचे थकीत वेतन अदा केल्याचा मोबदला म्हणून समाज कल्याण विभागाच्या दोघा शिपायांनी तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उजेडात आणला आहे. याप्रकरणी झालेल्या कारवाईत एका शिपायाला पकडण्यात आले.तर दुसरा शिपाई पळून जाण्यात यशस्वी झाला.
समाज कल्याण विभागाच्या सोलापुरातील सहायक आयुक्त कार्यालयातील वादग्रस्त कारभाराची नेहमीच नकारात्मक पातळीवर चर्चा होते. त्यात दोघा शिपायांनी तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागण्यापर्यंत केलेल्या धाडसाबद्दल प्रश्नार्थक चर्चा पुढे आली आहे. दोघे सामान्य शिपाई पाच लाखांपर्यंत लाच कशी मागू शकतात ? त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असू शकते, त्यादृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा >>> “मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी…”; कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानावरून अमोल मिटकरी संतापले
किसन मारूती भोसले (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. दुसरा शिपाई अशोक गेनू जाधव (वय ५२) हा मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा शोध घेतला जात आहे. समाज कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या एका आश्रमशाळेतील शिक्षिकेचे वेतन थकीत होते. हे थकीत वेतन अदा होण्यासाठी संबंधित शिक्षिका व तिच्या पतीने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात खेटे घातले असता अखेर थकीत वेतन अदा झाले. परंतु तूयाचा मोबदला आणि खुशी म्हणून दोघा शिपायांनी संबंधित शिक्षिकेच्या पतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे पाच लाखांची लाच मागितली. त्याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आली.