सावंतवाडी : श्री गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर बांदा येथे घाऊक खरेदी करून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या झायलो कारला मुंबई-गोवा महामार्गावर झाराप पत्रादेवी रस्त्यावर नेमळे येथे भीषण अपघात झाला. या अपघात दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. या विचित्र अपघातानंतर जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका अपघातस्थळापासून एक किलोमीटर अंतरावर शॉट सर्किटमुळे पेट घेतला. पेटत्या रुग्णवाहिकेतून दोन्ही रुग्ण, डॉक्टर आणि ड्रायव्हरने बचाव केला. मात्र झायलोचा ड्रायव्हर गंभीर असल्याने गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातातील मयत आणि जखमी हे मालवण गोठण येथील आहेत.

झायलो गाडीचा टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्या पलीकडील रस्त्यावर जाऊन शेतीत पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात दोघे जण जागीच ठार तर इतर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी संपर्क साधत बांदा येथील १०८ रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना एक किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण, चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा  मोठा स्फोट होत असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली होती.

या अपघातात मालवण तालुक्यातील गोठणे येथील लोचन सुरेश पालांडे (४०), संतोष भास्कर परब (४०) हे जागीच ठार झाले, तर गाडीचा चालक विशाल वसंत हाटले (३०) हा गंभीर जखमी झाला आहे. यामधील चौथा दीपक गोविंद आचरेकर (३२) हा किरकोळ जखमी असून बालंबाल बचावला आहे.