बीड : जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळ पर्यंत पावसाची रिप रिप सुरूच होती.धारूर येथील वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही चार चाकी व ऑटो वाहून गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकाचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.

धारूर तालुक्यातील वाण नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने रुई येथील पुलावरून चार चाकी वाहनातून जात असताना माजी सरपंच नितीन कांबळे हे वाहनासह वाहून गेले.त्यांचा मृतदेह काही अंतरावर असलेल्या बंधाऱ्यात आढळला. तर दुसऱ्या घटनेत आवरगाव येथील पुलावरून देखील पाणी वाहत असताना अनिल लोखंडे याने आपला रिक्षा या पुलावरून पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला असता लोखंडे हे रिक्षासह वाहून गेल्याची घटना घडली.दरम्यान त्यांचा रिक्षा काही अंतरावर आढळून आला. चालकाचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

मांजरा धरणातून नदीपात्रात १० हजाराहून अधिक विसर्ग

बीडच्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून सकाळी १० वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवण्यात आला आहे.मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले.

कालपासूनच या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते आणि त्यातून ५२४१ क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला जात होता मात्र रात्रभर धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे आता पाण्याचा विसर्ग दुपट्टीने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे.