चोरटय़ांच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी
शहराच्या मध्यवर्ती दत्त चौकातील दुकाने व बँक फोडण्याच्या प्रयत्न आणि त्यानंतर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरटय़ांना धाडसाने पकडण्यात आले. ही चित्तथरारक घटना काल शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
नवल जवानसिंग भुजया (३५, रा. नावे, ता. कुकशी, जि. धार-मध्य प्रदेश) व रायचंद फत्तू वसुनिया (२२, रा. मंगरदार, ता. कुकशी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे आहेत. त्यांच्याकडून कटावणी, गज व रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या चोरटय़ांकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या घटनेत पोलीस हवालदार तानाजी रतन शिंदे व प्रफुल्ल हिंदुराव गाडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हवालदार प्रफुल्ल गाडे व आशिष साळुंखे हे दोघे पोलीस रात्रगस्त घालत असताना, दत्त चौकात दोन संशयित हातामध्ये लोखंडी गज घेऊन पाटील हेरिटेज इमारतीमध्ये जात असल्याचे त्यांनी पाहिले. यावर या पोलिसांनी आपली दुचाकी थांबवून संशयितांवर लक्ष ठेवत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस सहनिरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पोलिसांना कळवले. दरम्यान, संशयितांनी ‘हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट’ हे दालन फोडून तेथीलच साई डायग्नॉस्टिक सेंटरही फोडले आणि ते बँक ऑफ बडोदाच्या शाखेचे शटर उचकटून आत जाण्याच्या ते तयारीत होते. त्याच वेळी संतोष चौधरी व पोलीस कर्मचारी घटनास्थळाकडे यायला निघाले असता, यापूर्वीच कॉन्स्टेबल तानाजी शिंदे दत्त चौकात पोहोचले होते.
बँक ऑफ शाखेचे शटर उचकटण्याचा आवाज झाला असता इमारतीमधील लोकही जागे झाले आणि चोरटे भीतीने जिन्यावरून खाली पळाले. यावर प्रफुल्ल गाडे त्यांच्याकडे धावल्याने चोरटय़ांनी त्यांच्या डोक्यात गज घातला, तर तानाजी शिंदे यांच्या हाताला जोराचा चावा घेतला. हे दोघेही जखमी झाले असतानाही त्यांनी चोरटय़ांना सोडले नाही. घट्ट पकडून ठेवले आणि सुदैवाने तेथे पोलीस सहनिरीक्षक संतोष चौधरी व पोलीस कर्मचारी दाखल झाल्याने दोन्ही चोरटे चतुर्भुज झाले. यावर रक्तबंबाळ झालेल्या प्रफुल्ल गाडे व आशिष साळुंखे यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.