सावंतवाडी : प्रामाणिक आणि तत्पर सेवेचं एक अनोखं उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील कचरा डंपिंग ग्राउंडवर समोर आलं आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या दोन स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेल्या ₹१.५० लाख किंमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा शोध घेऊन ते संबंधित महिलेला परत केले.
या ‘ मंगळसूत्र’ची दोडामार्ग परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांकडून या कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची कचरा गाडी (घंटागाडी) नेहमीप्रमाणे सकाळी ११.१५ वाजता कचरा संकलनासाठी दोडामार्ग – सावंतवाडा परिसरात आली होती. भाड्याने राहणाऱ्या सौ. सोनाली आपा देसाई यांनी कचरा गाडीत टाकला. मात्र, काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे मंगळसूत्र दिसेनासे झाले ते हरवले आहे. घरातील शोधाशोध निष्फळ ठरल्यावर त्यांना संशय आला की, ते कचऱ्याच्या डब्यात चुकून पडले असावे.
याबाबत त्यांनी तातडीने सावंतवाडा येथील प्रसिद्ध दशावतारी नाट्यकलाकार श्री. उली नाईक यांना माहिती दिली. श्री. नाईक यांनी वेळ न घालवता नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी श्री. प्रताप राऊळ आणि श्री. सुनील आरोसकर यांच्याशी संपर्क साधला.माहिती मिळताच राऊळ आणि आरोसकर यांनी तात्काळ डंपिंग ग्राउंड गाठले. दुर्गंधी आणि कचऱ्याची पर्वा न करता, त्यांनी घंटागाडीतून टाकलेला कचरा बाजूला सारून शोधमोहीम सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अखेर सोनाली देसाई यांच्या कचऱ्यामध्ये हरवलेले मंगळसूत्र सापडले.
बाजारात ज्याची किंमत सुमारे ₹१,५०,००० आहे, ते मंगळसूत्र दोन्ही कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे सौ. सोनाली देसाई यांचे पती श्री. आपा वसंत देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल देसाई दांपत्याने कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सामान्य परिस्थितीत दुर्लक्षित वाटणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.