सोलापूर : प्रेमसंबंधास आड आलेल्या जन्मदात्या आईसह भाऊ व बहीण या तिघांचा निर्घृणपणे खून केल्याच्या आरोपावरून दोघा सख्ख्या बहिणींविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्यात सोलापूरच्या सत्र न्यायलयाने दोघींना निर्दोषमुक्त केले आहे. रतन रणछोड जाधव (वय २१) आणि काजल रणछोड जाधव (२३) अशी आरोपी बहिणींची नावे आहेत. या गाजलेल्या खटल्याची सुनावणी मावळते जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांच्यासमोर झाली.

मूळ गुजरातचे असलेले रणछोड जाधव हे कुटुंबीयांसह मंगळवेढा रस्त्यावर ति-हे येथे सिद्धनाथ साखरजवळ वस्तीवर राहून दुग्ध व्यवसाय करायचे. यातील आरोपी काजल व रतन या दोघी बहिणींची लग्ने वडील रणछोड जाधव यांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध ठरविली होती. काजल हिचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर वडील रणछोड जाधव, आई हतयबाई, बहीण लाखी व भाऊ मफा यांनी तिला मारहाण व जाचहाट करायला सुरुवात केली होती.

हेही वाचा – “शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जातील, कारण…”, भाजपा खासदाराचा मोठा दावा!

दुसरी मुलगी रतन हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिलासुद्धा मारहाण व्हायची. त्यामुळे काजल व रतन दोघी चिडून होत्या. घटनेअगोदर २४ तासांत या दोघींनी आई-वडील व भावंडांना उद्देशून तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. ४ एप्रिल २०१८ रोजी वडील रणछोड जाधव हे गुजरात येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन काजल अणि रतन यांनी ६ एप्रिल रोजी भाऊ मफा (वय २१) व बहीण लाखी (वय २२) यांच्या डोक्यात पहारीने मारून खून केला व त्यानंतर बाहेर गेलेली आई हतयबाई (वय ५०) घरी आल्यानंतर तिचादेखील निर्दयपणे खून केला, असा सरकार पक्षाचा आरोप होता. खटल्याच्या न्यायालयीन सुनावणीवेळी आरोपींचे वकील जयदीप माने यांनी सरकार पक्षाचे आलेले पुरावे व जबाबांतील तफावती मांडल्या. सरकारतर्फे ॲड. एन. बी. गुंडे यांनी काम पाहिले.