सोलापूर : शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात पोमानी ॲप्रेल्स कारखान्यात पाण्याची टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचा टाकीतील रासायनिक विषारी वायूमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. अन्य एक कामगार सुदैवाने बचावला. सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन कारखाना मालकाची मोटार फोडली. त्यामुळे एमआयडीसी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सागर नारायण कांबळे
(वय २०, रा. स्वागतनगर, सोलापूर) आणि सिद्धाराम यशवंत चिलगेरी (वय २८, रा. जुळे सोलापूर) अशी या दुर्घटनेतील दुर्दैवी कामगारांची नावे आहेत.

पोमानी ॲप्रेल्स कारखान्यात निर्यातक्षम टॉवेलची निर्मिती होते. या कारखान्यात पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तीन कामगार गेले होते. परंतु टाकीत पसरलेल्या रासायनिक विषारी वायुमुळे दोन कामगारांचा श्वास गुदमरला आणि ते टाकीत कोसळले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने धाव घेऊन बचाव कार्य केले. एमआयडीसी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.