छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षे वयाच्या स्वत:च्या मुलाची आईने दहा हजारांत विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाची दुसऱ्या संबंधांत अडचण नको म्हणून उमरगा तालुक्यातील मुरुम येथील महिलेने शपथपत्रावर मजकूर लिहून मुलाच्या विक्रीचा करार केला. सोलापूर येथून या मुलास पोलिसांनी ताब्यात घेऊन आजीच्या ताब्यात दिले आहे. मुलाची विक्री करणारी महिला फरार आहे.
पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाची विक्री जन्मदात्या आईनेच केल्याची तक्रार आजीने पोलिसांत केली. उमरगा तालुक्यातील मुरुम येथून सून आणि मुलगा हरवला असल्याची तक्रार आजीने पोलिसांत केली होती. प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर आईने मुलाच्या केलेल्या विक्रीचे प्रकरण समोर आले. सोलापूर येथे एका व्यक्तीस दहा हजार रुपयांत मुलाला विकल्याचा प्रकार समोर आला.
मुरुम येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आजीला सोबत घेऊन सोलापूर येथून मुलाला ताब्यात घेतले. चिमुकल्याला धाराशिव येथील जिल्हा बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
मुलाची खरेदी करणाऱ्या सोलापूर येथील कुटुंबाने धाराशिव येथील रुग्णालयात येऊन आम्ही मुलाला दत्तक घेतले आहे, असे म्हणत गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.