Uday Samant on Bhaskar Jadhav Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातील मोठा नेता अशी ओळख असलेल्या भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घ्याविशी वाटते, असं वक्तव्य नुकतंच एका मुलाखतीवेळी केलं होतं. तसेच त्यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर वाद असल्याची चर्चा रंगत आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरील नाराजी जाधव यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान, जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नाराज असल्याची अफवा पसरली आहे. या सगळ्यावर जाधव यांनी सोमवारी (२४ जून) स्पष्टीकरण दिलं. माझ्या नाराजीच्या चर्चा अर्थहीन आहेत, असं जाधव यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला जाधव यांना उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
उदय सामंत म्हणाले, “भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणं योग्य नाही, अशी माझी भावना आहे. माझं हे वक्तव्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा टोमणा नाही. ही माझी खरी भावना आहे. भास्कर जाधव यांनी अनेकदा माझ्यावर टीका केली आहे. माझ्याबद्दल बोलताना मातोश्रीचा (शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) राग काढला आहे. मी जवळचा माणूस असल्यामुळे त्यांचं ऐकून घेतो. म्हणूनच माझ्यावर राग काढतात. मात्र, ते जे काही बोलले त्या मातोश्रीच्या भावना होत्या. भास्कर जाधव हे मातोश्रीवर प्रचंड नाराज असल्याचं तुम्ही वार्ताहरांनी मला सांगितलं. मी ही त्यावर खुल्या मनाने सांगतो की भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं तर आम्हाला आनंद होईल.
आमदार भास्कर जाधव व खासदार संजय राऊत यांच्यात वाद असल्याची चर्चा चालू आहे. “भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात कधी गेली नाही. जी हुजुरी करायला मी कुठे गेलो नाही”, असं म्हणत जाधव यांनी संजय राऊतांना टोला लगावला होता. तर, उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांच्या वक्तव्याची दखल घेतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.
भास्कर जाधव राजकीय संन्यास घेणार? संजय राऊत म्हणाले…
संजय राऊत म्हणाले, “भास्कर जाधव हे आमचे जवळचे सहकारी व शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख नेते आहेत. त्यांच्याकडे दांडगा राजकीय अनुभव आहे. ते चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या गेल्या काही काळात त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी नक्कीच मोठं योगदान दिलं आहे. ते आम्हा सर्वांना प्रिय आहेत. त्यांची प्रतिक्रिया मी वृत्तपत्रांमध्ये वाचली आहे. त्यांनी आजवर पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या योग्यरित्या पेलवल्या आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात व कोकणात असतात. ते आता मुंबईत येणार आहेत. ते मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील. भास्कर जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात काय आहे ते आम्ही समजून घेऊ. त्यांच्या मनातील वेदना उद्धव ठाकरे समजून घेतील”.