Barsu Refinery Project : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले असून पुढील आठ ते दहा दिवसांत हे परिक्षण संपेल. मात्र, हे परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले. बारसू येथे रिफानयरी प्रकल्प होऊ नये याकरता ग्रामस्थांसह राजकीय नेत्यांनीही कडाडून विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणात गंभीर वातावरण निर्माण झाले असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आज बैठक घेतली. या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे आज उदय सामंतांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हे लावणार नाही

“या प्रकरणात प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे होते, अशी सर्वांची अपेक्षा होती. आम्ही चार पाऊल पुढे टाकले आहेत. आंदोलनकर्त्यांना शंका होती की ३५३ सारखी गुन्हे लावली जातील,असे गुन्हे लावणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी जैतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

जमिन खरेदीची चौकशी

“त्या भागात काही जमिनी खरेदी केले आहेत, यामध्ये शासनाचे काही अधिकारी आहे. असं खासदारांनी आणि आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तेथे जमीन प्रमाणाबाहेर घेतली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. अनधिकृत जागेत जमीन घेतली असेल तर त्यांना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही सामंतांनी स्पष्ट केलं.

सविस्तर बैठक होणार

“शासनाने पुढचं पाऊल टाकलं आहे. तिथले लोक चर्चेसाठी तयार आहेत. अनेक लोकांशी माझी चर्चा झाली. विनायक राऊत यांच्यासोबत अजित यशवंतरावही उपस्थित होते. त्यांनीही तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. २ किंवा ३ तारखेला विस्तारीत बैठक मुंबईत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे”, असं सामंत म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या शंकांचे निरसन करणार

“उद्धव ठाकरे यांनाही जर ब्रिफिंग आवश्यक असेल तर त्यांची वेळ घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आमचे जिल्हाधिकारी, आयुक्त आजच त्यांच्याशी बोलतील. त्यांच्या शंकांचं निरसन करायचं असेल तर, आजपर्यंत जी कारवाई झाली, दडपशाही झाली त्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंना केलं जाईल. शरद पवारांना जिल्हाधिकारी आणि एसबी साहेबांनी ब्रिफिंग केलं आहे. अजित पवारांनाही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अन्य पक्षाच्या नेत्यांना ब्रिफिंग करण्याचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >> “जम्मू ते दिल्लीच्या २२४ परप्रांतीयांच्या बारसूत जमिनी”, विनायक राऊतांचा दावा, म्हणाले, “दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की…”

विरोधक सत्यजित चव्हाण यांच्याशी चर्चा

“आजही रत्नागिरी जिल्ह्यात येऊन सांगतोय की शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही. मातीचं परिक्षण झाल्यानंतर प्रकल्प येणार की नाही येणार यावर शिक्कमोर्तब होणार आहे. अत्यंत संयमाने आज चर्चा झाली आहे. कालदेखील सत्यजित चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली आहे. हा प्रकल्प रेटून पुढे न्यायचा नाही. सगळ्यांचं समाधान करून, शेतकऱ्यांना न्याय देऊन प्रकल्प पुढे न्यायचा आहे”, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

लाठीचार्ज नाही झटापट

माती परिक्षण थांबवण्याकरता गेलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला. “एखाद्या ठिकाणी लोक आक्रमक झाली असतील तर पोलिसांसोबत झटापट होते. लाठीचार्ज केलेला नाही. लाठीचार्ज समूहाने केला जातो. त्यातही जर लाठीचार्ज झाला असेल तर त्याची चौकशी करू”, असंही उदय सामंत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samants important meeting with vinayak raut regarding the refinery these six important decisions were taken read in detail sgk
First published on: 29-04-2023 at 15:24 IST