विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी उदय वाघ यांची सर्वसंमतीने निवड झाली. परंतु जिल्ह्य़ातील तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंबंधात पक्षांतर्गत वाद समोर आल्याने नेत्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. या पाश्र्वभूमीवर खासदारांनी दिल्लीवारी कमी करून कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, अंमळनेरचे अनिल पाटील, उदय वाघ, सुनील बढे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, उद्धव माळी व लालचंद बजाज आदी नऊ जणांची नावे जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत होती. त्या अनुषंगाने सर्वानी मोर्चेबांधणी केली होती. जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक एकमताने करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने उदय वाघ यांच्या नावावर एकमत झाले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी ए. टी. पाटील व हरिभाऊ जावळे यांच्यासह आ. गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, अशोक कांडेलकर, निवडणूक निर्णय अधिकारी विजया रहाटकर आदी उपस्थित होते.
रहाटकर यांनी जिल्ह्य़ातील भाजपची सद्यस्थिती व निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. तसेच जिल्हाध्यक्ष परंपरेनुसार एकमताने निवडण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर एकनाथ खडसे, प्रदेश सहसंघटक डॉ. राजेंद्र फडके यांनी पक्षांतर्गत मतभेदावर चिंता व्यक्त करीत भाजपचा बुरुज मजबूत राखण्याचे आवाहन केले.