खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप नेहमीच सुरू असतात. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. उदयनराजे भोसले म्हणाले की, “जर लोकांनी सांगितलं की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन.”

उदयनराजे म्हणाले की, “माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केलं आहे, आम्ही मान्य करू.” माध्यमांच्या प्रतिनिधींना उदयनराजे म्हणाले की, “हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तसं कोणी जर बोललं तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही.”

हे ही वाचा >> सावरकर अवमानावरून विधिमंडळात गोंधळ; सत्ताधाऱ्यांचे राहुल गांधीच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन

शिवेंद्रराजेंबद्दल उदयनराजे म्हणाले की, “ज्यांच्या जीवावर यांनी संस्था स्थापन केल्या ते सर्वांना माहिती आहे. मला लाज वाटतेय सांगताना, बोलतानासुद्धा कमीपणा वाटतो. मला बोलू की नको असं झालंय, पण अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनी लोकांचे पैसे खाल्ले. दुर्दैवाने मला सांगावसं वाटतं की, असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? आमच्या दारात कधी कोण आलं नाही, आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत.”