राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. राज्यापालांना पदमुक्त करा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आज खासदार उदयराजे भोसले यांनीही पत्रकार परिषद राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावले. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उदयराजे भावूक झालाचेही बघायला मिळाले.

हेही वाचा – “राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी…”; सुप्रिया सुळेंचं विधान!

“राज्यापालांच्या विधानानंतर आज राज्यभरातून आलेल्या विविध संघटनांशी आम्ही चर्चा केली. सर्वांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला. मात्र, एक विचार सतत मनात येतो. ज्या शिवरायांनी सर्वधर्म समभाव हा विचार दिला, आज त्यांचा सर्वपक्षीय नेते केवळ स्वार्थासाठी वापर करतात. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे फोटो लावतात, त्यांना अभिवादन केले जाते. मात्र, जेव्हा लिखान असेल किंवा विधान आणि चित्रपटांच्या माध्यमातून शिवरायांचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्हाला राग का येत नाही? मुळात या विषयावर आता जनतेने विचार करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली दिली.

हेही वाचा – राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “राजभवनाची खिंड…”

“गेल्या काही महिन्यांपासून शिवाजी महाराजांबाबत जे बोललं जात आहे. इतिहासाचे जे विकृतीकरण केले जात आहे. ते कुठतरी थांबवले गेले पाहिजे. नाही तर हाच मोडका तोडका इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, ही जबाबदारी सर्वांची आहे”, असेही ते म्हणाले.

“देशविरोधात केलेल्या एखाद्या कृत्याबाबत ज्याप्रकारे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, त्याचप्रमाणे महापुरुषांची बदनामी, त्यांच्या विरोधात नको ती विधानं करणाऱ्यांविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा” , अशी मागणीही त्यांनी केली. तसेच “अशा लोकांविरोधात तुम्ही कारवाई करू शकत नसाल तर कोणालाही राजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. निवडणुका आल्या की राजांचे नाव घेता, मग जेव्हा त्यांचा अवमान केला जातो. तेव्हा तुम्हाला दुखं वाटत नाही का? यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी भूमिका घेतली पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “हा राज ठाकरे निवडणूक जिंकेल आणि त्यानंतर…”, मनसेप्रमुखांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज देशात केवळ जातीपातीचं राजकारण सुरू आहे. हे थांबवलं नाही, तर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग जर तुम्हाला जातीपातीचे राजकारण करायचे असेल, तर कशाला शिवरायांचे नाव घेता? कशाला ढोंग करता? कशाला बेगडी प्रेम दाखवता? कशाला रेल्वे स्थानकांना विमानतळाला महाराजांचे नाव देता? आणि कशाला शिवजयंती साजरी करता?” असे प्रश्नही त्यांनी राजकीय पक्षांना विचारले. दरमान, यावेळी उदयनराजे भावूक झाल्याचेही बघायला मिळाले. “आज शिवरायांचा होत असेलला अवमान बघण्यापेक्षा मी मेलो असतो तर परवडलं असते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच येत्या ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन, आमचा आक्रोश, आमच्या वेदना आम्ही व्यक्त करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.