“सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो कुठे जायचे ते माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका”, असे टोमणे मारत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “असं का? लै मस्ती आलीये? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. बँक शेतकरी सभासदांची आहे, मी त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा”.

हेही वाचा – सातारा जिल्हा बँक निवडणूक : उमेदवारीवरून उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे संघर्ष

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत साताऱ्याच्या दोन्ही राजांचा संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी जाब विचारला होता. याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असे स्पष्ट करत बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला होता.

बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सत्ताधारी पॅनलमधून खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबत एकमत न झाल्याने उदयनराजेंच्या विरोधात सत्ताधारी पॅनेलने निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी पॅनेलच्या आमदार मकरंद पाटील यांच्यासह राजेंद्र राजपुरे व शिवरूपराजे खर्डेकर हे तिघेही एक एक अर्ज आल्याने बिनविरोध झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale on district bank election vsk
First published on: 30-10-2021 at 13:46 IST