भाजपाचे राज्यसभेवरील खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा जावळीचे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मागील काही काळापासून शाब्दिक वाद रंगलाय. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे.

शिवेंद्रराजे भोसलेंनी केलेल्या टीकेला आता उदयनराजेंनी उत्तर दिलंय. सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उदयराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेसाठी या असं आवाहन केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून शिवेंद्रराजेंवर निशाणा साधलाय.

“काय बाई सांगू? कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज. काहीतरी मला झालंय आज”, अशा ओळी म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला तेव्हा सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधताना उदयनराजेंना नारळफोड्या गँग असं म्हटलं होतं. उदयनराजेंच्या हस्ते सातऱ्यामध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनांच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंनी हा टोला लगावलेला. यावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना फटकारलं होतं. आम्ही नारळ वाढवून लोकांसाठी चांगली काम करतोय मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केलंय, असा टोला उदयनराजेंनी लागवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेला येण्याचं आवाहन केलंय. आमचा नारळफोडी गँग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामं केली असल्याने नारळ फोडतोय. आम्ही एखाद्याचं संपूर्ण घरदार उद्धवस्त केलेलं नाही, असा चिमटा काढतानाच चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहेत, असंही भाजपा खासदार म्हणालेत. मात्र पुढच्याच ओळीत त्यांनी चर्चेला येण्याचं धाडस पाहिजे असं म्हणत त्यांनी शिवेंद्रराजेंना आव्हान दिलंय. काही कारण नसताना लहान मुलाप्रमाणे शिवेंद्रराजेंकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचंही उदयनराजे यावेळी म्हणाले.