शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाची ही गळती अद्याप सुरूच आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.

एवढंच नव्हे तर माजी आमदार तुकाराम काते यांच्या पत्नी व बीएमसीच्या माजी नगरसेविका समृद्धी काते यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. तुकाराम काते हे मुंबईतील अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ते ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुख होते. तर समृद्धी काते या उपशाखाप्रमुख होत्या. याबाबतचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलं आहे.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुकाराम काते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि मुंबईच्या कायापालटात योगदान देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला.”

हेही वाचा- “राष्ट्रवादीला २००४ साली मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, पण…”, अजित पवारांचं विधान

दुसरीकडे, शनिवारी मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेसच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ असलेल्या धारावीतील आहेत.

हेही वाचा- “बायकोनं जेवढे किस घेतले नाहीत, तेवढे…”, अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांनी एवढ्या मोठ्या संख्येने शिंदे सेनेत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईतील काँग्रेसच्या सात माजी बीएमसी नगरसेवकांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये सायन कोळीवाड्यातील नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील वाहिद कुरेशी, ज्योत्स्ना परमार, धारावीतील कुणाल भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने आणि त्यांच्या पत्नी गंगा माने अशा नगरसेवकांचा समावेश आहे.