Sanjay Raut and Uddhav Thackeray Interview Highlights : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’त मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासह देशाच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असेल्या घडामोडींबाबतही त्यांनी परखड मत मांडलं आहे. या बरोबरच शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीबाबत अद्याप राज ठाकरेंशी चर्चा झाली की नाही? याचा खुलासा देखील खुद्द उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला आहे.
“…तर आम्ही सहनही करत नाही” : उद्धव ठाकरे
मुंबई आणि मुंबईमधील उपनगरांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावरून महाभारत घडताना दिसतंय आणि कधी नव्हे तो मराठी माणूस एकवटला आहे. मराठी माणसांना ही जाग कशी आली? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “मराठी माणसांचं एक वैशिष्ट्ये आहे. मराठी माणूस अतातायी करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मराठी माणूस कोणावरही अन्याय करत नाही. पण हाच मराठी माणूस जर त्याच्यावर अन्याय झाला तर सहनही करत नाही. शेवटी सहनशिलतेचा कडेलोट व्हायला लागला. त्यामुळे आता मराठी माणूस पेटून उठला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी मराठी माणूस पेटून उठला होता तसाच आताही मराठी माणूस पेटून उठलेला आहे. आम्ही किती काळ सहन करायचं? मरठी माणसांची चूक काय?”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
शिवसेनेचा हिंदी भाषेला विरोध आहे का?
“शिवसेनेचा हिंदी भाषेला विरोध नाही. माझे आजोबा देखील सांगायचे की तुम्हाला जेवढ्या भाषा शिकायच्या तेवढ्या शिका. पण तुम्ही जबरदस्ती करू नका. आज तुम्ही (संजय राऊत) राज्यसभेत हिंदीत बोलता. मी देखील अनेक वेळा माध्यमांसमोर हिंदीत बोलतो. त्यामुळे आमचा हिंदीला विरोध किंवा हिंदी भाषेचा आम्हाला द्वेष नाही. पण हिंदींची सक्ती नको. आमचा हनुमान चालीसाला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला मारुती स्तोत्र का विसरायला लावता? आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो तुम्ही हनुमान चालिसा म्हणा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटलाय का?
“मला वाटतं की महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्य असा संघर्ष पेटला नाही. पण अशा प्रकारचा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. मात्र, हा संघर्ष पेटत नाही. याचं कारण आमची भूमिका स्पष्ट आहे. कारण आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाहीत. आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी आहोत, पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत. जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा आपण हिंदू म्हणून एकत्र असतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे-आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ५ जुलैच्या मोर्चाची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. २० वर्षांनंतर मराठीच्या मुद्यांवर आम्ही एकत्र आलो. खरं तर आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसांनाच नाही तर इतर भाषिकांना देखील आनंद झाला, अगदी मुस्लिमांना देखील आनंद झाला. मात्र, यावरून काहींना पोटशूळ उठलं असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे खरं आहे की मोर्चामुळे राज्य सरकाराला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘लोकांच्या मानात आहे तेच करणार’, याचा अर्थ काय?
५ जुलैच्या मोर्चात बोलताना राज ठाकरे असं म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं ते साकार होतंय. त्यानंतर तुम्हीही वारंवार म्हणालात की लोकांच्या मानात आहे ते आम्ही साकार करू. मग याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा? असं राऊत यांनी विचारलं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आता याचा अर्थ कसा घ्यायचा? तर त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हाच त्याचा अर्थ होतो. मराठी माणसांनी मराठीच्या मुद्यांवर एकत्र आलं पाहिजे. अन्यथा शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय असं होईल”, असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
मनसेशी युतीबाबत तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली का?
लोकांचा रेटा आहे की तुम्ही ( राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राजकीय दृष्ट्या एकत्र यावं, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “ठीक आहे, आता २० वर्षांनी एकत्र आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असाही त्याचा भाग नाही. पण मी जे काही म्हटलं की मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी आणि मराठी आस्मितेसाठी जे-जे करण्याची गरज आहे, ते-ते करण्याची माझी तयारी आहे”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीबाबत केलं.
दरम्यान, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की, मग यासाठी (युतीसाठी) तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे का? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “होईल. पहिलं आम्ही २० वर्षांनी एकत्र तर आलो आहोत, हीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या भाषणात म्हटलं की आज आमच्या भाषणा पेक्षा एकत्र दिसण्याला फार महत्व आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.