मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हद्वारे साधलेल्या जनसंवादावर भाजपाने निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे शब्दांचा फुलोरा’, असं म्हणत भाजपाने काही सवाल मुख्यमंत्र्यांना केले आहेत. “१२ कोटी लसी घेण्यासाठी एक रकमी चेक देणारे. इथल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेत काम करण्याऱ्यांच्या समस्याकडे मात्र लक्ष देत नाहीत,” असा टोलाही भाजपाने लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी रात्री केलेल्या फेसबुक लाईव्ह संवादावरून लक्ष्य केलं आहे. उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना काही सवालही केले आहेत. “कालचं मुखमंत्र्याचं भाषण म्हणजे निव्वळ भुलभुलय्या. ना कोणती उत्तरं ना कोणती दिशा. १२ कोटी लसी लगेच घेण्याच्या वल्गना, पण त्या देण्याच्या व्यवस्थेचे काय? पाच लाख लसी महाराष्ट्रात दिल्याच नाहीत, मग तरी त्याची घोषणा करण्यात कसली शेखी? बाते बडी बडी, काम का तो कूछ पता नहीं हे या राज्य सरकारचं वैशिष्ट्य आहे,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

“राज्यात फक्त १० लाख लसीकरणाची क्षमता आहे, तर सांगितली का नाहीत? किती हजारांमागे केंद्र उभी केली, त्यांची यादी, ही लस देण्यासाठी काय यंत्रणा उभी केली आहे? १८ ते ४४ मध्ये परत वयाच्या अटी टाकणार की नाव नोंदविलं त्याला लस देणार? यातल्या एकाही प्रश्नांचे उत्तर दिले नाही, कारण नुसताच शब्दांचा फुलोरा करण्याची सवय या सरकारला लागली आहे. १२ कोटी लसी देण्यासाठी एक रकमी चेक देणारे. इथल्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेत काम करण्याऱ्यांच्या समस्याकडे मात्र लक्ष देत नाहीत,” अशी टीका उपाध्ये यांनी केली.

“१५ दिवस कडक निर्बंध वाढवताना काही ठोस माहिती घेऊन येतील असं वाटलं होतं. सहा महिन्यांपूर्वी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवणारे मुख्यमंत्री त्याची तयारी मात्र काहीच न करता केवळ हे सुरू ते सुरू अशी गोल गोल उत्तर देतात. रिक्षाचालकांना मदतीची जी घोषणा केली होती, ती रक्कम देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, शेतकरी सगळेच मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रेमडेसिवीर व आँक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे न्यायालयात राज्य सरकार सांगते, मात्र मुख्यमंत्र्यापासून सर्व जण बाहेर केंद्र सरकारच्या नावाने कांगावा करतात, हे जनता पहात नाही अशा भ्रमात कुणी राहू नये,” असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray live maharashtra bjp keshav upadhye maharashtra lockdown covid 19 crisis maharashtra bmh
First published on: 01-05-2021 at 16:19 IST