शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी विरोधकांच्या नव्याने निर्माण झालेल्या ‘इंडिया’ आघाडीची तुलना दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी केल्यावरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. तसेच असं असेल तर मोदी दक्षिण अफ्रिकेला इंडियाचे पंतप्रधान म्हणून केले होते, की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून केले होते असा सवाल ठाकरेंनी केला. ते रविवारी (२७ ऑगस्ट) हिंगोलीत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून एकत्र आलो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घसरले. त्यांनी इंडियाचा उल्लेख घमेंडीया करून टाकला. ते आम्हाला घमेंडीया म्हणत असली, तर आम्हीही त्यांना घमेंडीए असं म्हणतो. ते एनडीए आहेत, पण घमेंडी, गर्विष्ट आहेत. आता जो एनडीए म्हणून शिल्लक राहिलाय त्याला काही आकार उकार, शेंडा बुडखा शिल्लक राहिलेला नाही.”

“एनडीएचा आता अमिबा झाला आहे”

“अमिबा नावाचा एकपेशीय जीव पोटात गेला की पोट बिघडतं. तो एकपेशीय असतो, पण त्यालाही आकार उकार काही नसतं. तो कसाही वाढत असतो, तशीच स्थिती एनडीएची झाली आहे. एनडीएचा आता अमिबा झाला आहे. यांच्याबरोबर मुळात पक्ष आहेच किती. पक्ष फोडून केवळ थिगळं लावून एनडीए उभी केली जात आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

“माझे विचार ऐकायला इथे आलेले दहशतवादी आहेत का?”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलो आहोत, तेव्हा ते आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करतात. इथे जमलेले सगळे दहशतवादी आहेत का? माझ्या प्रेमाखातर माझे विचार ऐकायला इथे आलेले दहशतवादी आहेत का? इथे जमलेल्यांनी आपलं काम करायचं थांबवलं तर यांचं सरकार गडबडेल, पीक पिकणार नाही. उद्योगधंदे चालणार नाही. असा हा घाम गाळणारा माझा शेतकरी-कामगार माझ्यासमोर बसलेला आहे. हा अतिरेकी नाही.”

“आपल्याही दाढीवाल्याने भाजपा वॉशिंग पावडर लावली”

“हे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे आरोप करतात आणि तेच लोक यांच्या पक्षात आले की, धुवून साफ होतात. पूर्वी निरमा वॉशिंग पावडर होती, आता भाजपा पावडर आहे. आपल्याही दाढीवाल्याने ही पावडर लावली आहे. ही पावडर लावल्यावर सगळे साफ झाले आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लावला.

व्हिडीओ पाहा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदी अफ्रिकेला इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून गेले होते का?”

“मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, काल परवा मोदी अफ्रिकेत गेले होते. मोदी मणिपूरमध्ये गेले नाही तरी हरकत नाही, पण ते दक्षिण अफ्रिकेला गेले. मग मोदी तिकडे ‘प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ म्हणून गेले होते, भारत मातेचे, इंडियाचे पंतप्रधान म्हणून अफ्रिकेला गेला होतात, की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेला होतात? हे त्यांनी सांगावं,” असा सवालही ठाकरेंनी केला.