महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना देशासह राज्यातील विविध मुद्य्यांवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी माध्यमांच्या कार्यशैलीवर देखील बोट ठेवलं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन वाझे, मुकेश अंबानींच्या घराखाली आढळलेली बाँब ठेवलेल्या गाडीबद्दलही त्यांनी विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे म्हणाले, “आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि नको त्या सगळ्या विषयात सगळं प्रकरण फिरवलं जातं. तुम्हाला(माध्यमांना) जे फीड येत त्यानुसार तुम्ही छापता, परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातो या सगळ्या लोकांकडून आणि तुम्ही ती गोष्ट दाखवतात. उदाहरणार्थ आर्यन खान प्रकरण जवळपास २८ दिवस सुरू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्यानंतर कोणी विचारलं देखील नाही, सध्या कसा आहे? तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुशांतसिंग प्रकरण त्यानंतर अंबानीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला त्याचं काय झालं पुढे माहीत नाही…शेवटी तुमचाही कुठतरी वापर केला जातोय आणि त्यामधून या सर्व गोष्टी घडत आहेत. मूळ विषय राहतात बाजूला. परवाची बातमी परंतु त्यामध्ये तुमच्या वरिष्ठांना किती रस होता मला माहिती नाही, परंतु लोकसभेत जी बातमी सांगितली गेली की पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडला. पाच लाख व्यावासायिक ज्यावेळी देश सोडतात, त्यावेळी नोकऱ्यांवरती त्याचा काय परिणाम होतो? यावर आपल्याकडे चर्चा होत नाही. यावर आपल्याकडे बातम्या लावल्या जात नाही. आपल्याकडे २८ दिवस आर्यन खान चालतो, अनिल देशमुखांची अटक होते त्यानंतर वाझे प्रकरण सुरू होतं. मग ती गाडी गेली कुठे? मग त्याच्या मागे सगळेजण लागतात. पण हे पाच लाख जण गेले कुठे? याचा शोध घ्यावा असं कोणालाही वाटत नाही.”

“ज्यांनी पेपर फोडला ते अजून फुटले नाहीत म्हणून… ” ; राज ठाकरेंचं विधान!

तसेच, “आज देशभरात असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मुलांचे शालेय शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेकांचे उद्योग बरबाद झालेले आहेत. संपलेले आहेत. काय होतंय काय माहिती नाही, इतकी अनिश्चतता सगळ्या गोष्टींची असताना, आम्ही काय फिरवतो आहोत तर आम्ही असले विषय फिरवतोय. या अनिश्चततेला जबाबदार सगळेचजण आहेत. जसे राजकारणी आहेत तसे तुम्ही (माध्यमं) पण आहात.”

व्यावासियक देश सोडून गेले त्याबद्दल बोलताना म्हणाले, “मी कालच म्हणालो यामध्ये नोटबंदीपासून ते या सगळ्या लॉकडाउनपर्यंत सर्वच गोष्टी आल्या आहेत.” असंही यावेळी राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर राज ठाकरे म्हणाले की, “भाजपा नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं बोललं जात आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आताचं एकूण हे तिघांचं सरकार पाहता, काही आता सरकार पडेल असं मला वाटत नाही. तसेच, मला वैयक्तिक कुठले कोणाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. घोटाळ्यांपेक्षा कोणच्या घरात मला डोकवायचं नाही. या सगळ्यामध्ये एकटे किरीट सोमय्या… ते पूर्वीपासून हेच करत आहेत, त्या सगळ्या गोष्टींची देखील उत्तरं सापडत नाहीत. महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते, त्यासाठी म्हणून आपण शॅडो मंत्रिमंडळ निर्माण केलं मात्र त्याचवेळी नेमका लॉकडाउन लागला. या करोनाच्या काळात आमच्या अनेक लोकांनी प्रचंड काम केलं. परंतु ते प्रचंड का हे सोशल मीडियावरतीच राहीलं. ज्यांच्यापर्यंत आमचे लोक पोहचले त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. रोजच्या रोज आपण प्रत्येक गोष्टीला शिव्या घालायच्या, या औंरंगाबाद महापालिकेत एवढे प्रश्न आहेत, पाणी, रस्त्यांसह अनेक प्रश्न असतील, पण निवडणुकीच्या वेळी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विसर पडत असेल, तर मला असं वाटतं की मग तुम्ही हेच भोगा. ”

…मला याचा अर्थच अजुनपर्यंत लागलेला नाही –

“ सचिन वाझे हे सहा महिने तुरूंगात होते आणि जवळपास सात-साडेसात वर्षे ते त्या पदावर नव्हते, बडतर्फ होते. त्यानंतर त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला. शिवसेनेच्या कार्याध्यक्षांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मुकेश अंबानी हे आताचे मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांच्या अतिशय जवळचे मित्र. आता एक जवळचा माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घराखाली जाऊन बॉम्ब लावतो, मला याचा अर्थच अजुनपर्यंत लागलेला नाही आणि त्याचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही. तोपर्यंत तुम्हाला पुढची प्रकरण काय आहेत? ही कधी समजणारच नाहीत. म्हणून मी त्याचवेळी बोललो होतो की मूळ विषय राहील बाजूला हे प्रकरण कुठेतरी भरकटत नेतील आणि मूळ विषयावर कधी येणार नाहीत. जर वाझेने तिथे गाडी ठेवली आहे, जर वाझे हा शिवसेनेचा माणूस म्हणून आहे. मुकेश अंबानी जर उद्धव ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत. तर वाझेने तिथे जाऊन गाडी का ठेवली? हा माझा एक साधा सरळ प्रश्न आहे. याचं उत्तर अजुनपर्यंत येत नाही. माझं त्यावेळाही म्हणणं तेच होतं आणि आजही तेच आहे की हे जिथून सुरू झालं आहे, त्याचा जर समजा शोध लागला तर पुढे फटाक्याची माळ लागेल.” असं देखील राज ठाकरे यांनी याप्रसंगी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray sachin waze mukesh ambani and the car bomb raj thackerays prediction msr
First published on: 14-12-2021 at 14:52 IST