मुंबई : भ्रष्टाचाऱ्यांना बरोबर घेऊन सरकार चालविणे, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपरिहार्यता व एककलमी कार्यक्रम असल्याचे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोडले. नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर ‘इंडिया आघाडी’च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. परंतु या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने विरोधकांशी केलेले वर्तन लांच्छनास्पद आणि लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) सोमवारी राज्यभरात अनेक ठिकाणी जनआक्रोश आंदोलन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते. ‘विधिमंडळात आरोप करून व पुरावे देऊनही, राज्यपालांना निवेदन देऊनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर फडणवीस यांनी कारवाई केलेली नाही. सत्ता येते आणि जाते, पण इतिहासात तुमची नोंद काय होते, ते महत्वाचे असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडा जरी अभिमान, स्वाभिमान व धैर्य असेल तर त्यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी ठाकरे यांनी जनआक्रोश आंदोलनात केली.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना घरी पाठविण्यात आले होते. हे सरकार जनताभिमुख नाही. गृहराज्यमंत्री बार चालवीत आहेत. कृषीमंत्री शेतकऱ्यांची थट्टा करीत सभागृहात रमी खेळत होते. त्यांना आता आवडीचे खाते मिळाले आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राला भ्रष्टाचारामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून पंक्तीत बसविले आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.

दरम्यान, मंत्री ‘हनीट्रॅप’मध्ये अडकतात, त्यांच्याकडे पैशांनी भरलेली बॅग असते, आदी प्रकारांची मला लाज वाटते, अशाप्रकारचे फलक घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शने आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

ईव्हीएम ‘हॅक’ करण्याचे प्रात्यक्षिक

भाजपबरोबर युतीत असताना त्यांच्या एका नेत्याने ईव्हीएम कसे हॅक करायचे, याचे प्रात्यक्षिक दाखविले होते, त्यांनी त्याचे नाव सांगितले नाही, पण तो आता नेता राहिलेला नाही. निवडणुकीत अमुक जागा जिंकून देतो, असा दावा करणारे प्रत्येक निवडणुकीआधी मला भेटतात. त्यांचे म्हणणे मी कधी गांभीर्याने घेतले नाही. पण गेल्या विधानसभा निवडणुकीआधी भेटलेले दोघेजण मला पुन्हा भेटले, तर हे कसे करतात, ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

मला फडणवीस यांची कीव येते. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत बापजादे बसले आहेत, तरीही भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढण्याची त्यांची हिंमत होत नाही. त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही, मग ते भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालून बदनामी का ओढवून घेत आहेत?’ – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख